लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग : मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान सध्या (रोल ऑन रोल ऑफ) रोरो जलप्रवासी वाहतूक केली जाते. आगामी काळात या जलप्रवासी वाहतुकीच्या कक्षा श्रीवर्धन तालुक्यापर्यंत रुंदावणार आहेत. मुरुड तालुक्यातील काशिद पाठोपाठ श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे रोरो सेवेसाठी सुसज्ज जेटी उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

चार वर्षापुर्वी मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातील मांडव्या दरम्यान रो रो सेवा सुरू करण्यात आली होती. या जल प्रवासी वाहतूक सेवेमुळे मुंबईतून अलिबागला येणाऱ्या पर्यटकांना आपली वाहने बोटीतून आणण्याची सुविधा उपलब्ध झाली. भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर अवघ्या ५० मिनटात पार करणे शक्य झाले. यामुळे इंधन आणि वेळेची बचत होण्यास मदत झाली. प्रवाश्यांचा या सेवेला लाभलेला प्रतिसाद लक्षात घेऊन आता मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांना रो रो जलप्रवासी सेवेनी जोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सागरमाला योजने अंतर्गत काशिद येथे रो रो जेटी, टर्मिनल, वाहनतळ, ब्रेक वॉटर बंधारा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी ब्रेक वॉटर बंधारा उभारणीचे काम पूर्ण झाले असून, जेटीचे काम पुढील चार महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. जानेवारी २०२५ पासून या टर्मिनल मधून प्रत्यक्ष प्रवासी वाहतुक सुरू करण्याचे नियोजन आहे. या जेटी मुळे मुंबई ते काशिद हे अंतर अवघ्या दोन तासात पूर्ण होऊ शकणार आहे. यासाठी जवळपास दिडशे कोटींचा निधी खर्च होणार आहे.

आणखी वाचा-बारामतीत काका-पुतण्याची लढत? विधानसभेसाठी अजित पवारांविरोधात शरद पवार मोठा निर्णय घेणार?

काशिद पाठोपाठ आता श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथेही रो रो जेटीचे बांधकाम करण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डाने घेतला आहे. यासाठी ८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, लवकरच या कामाल सुरुवात होण्याची शक्यता आहे. या जेटीमुळे मुंबईतून थेट श्रीवर्धन पर्यंत रो रो सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे मुंबई ते श्रीवर्धन पर्यंतचा प्रवास वेळ निम्यावर येणार आहे. अवघ्या अडीच ते तीन तासात मुंबईतून श्रीवर्धन पर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. या रोरो सेवेमुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

करोना काळात काशिद येथील जेटीचे काम रखडले होते. मात्र आता ते मार्गी लागले आहे. ब्रेक वॉटर बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. जेटीची व वाहनतळाची उर्वरीत कामे पावसाळ्यानंतर पूर्ण केली जातील. पुढील वर्षापासून काशिदपर्यत रो रो सेवा सुरू करता येऊ शकले. दिघी येथील जेटीचे कामही लवकरच सुरू होईल. -सुधीर देवरे, मुख्य कार्यकारी अभियंता, मेरीटाईम बोर्ड