चिपळूण तालुक्यातील रिक्टोली या गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मंजूर पाणी योजना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील गटबाजीमुळे रखडली आहे. दरम्यान या योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या गावकऱ्यांपैकी सात जणांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे १ कोटी ७ लाख रुपयांची ही योजना गेली काही वष्रे स्थानिक राजकारणाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याबाबत न्यायालयातही दाद मागण्यात आली. अखेर २४ जानेवारी २०१३ रोजी या योजनेला शासनातर्फे मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी आवश्यक सर्व अटींची पूर्तता केली. तरीसुद्धा गेली तीन वष्रे काम रखडलेलेच आहे. या प्रकरणी गेल्या २६ जानेवारीला उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. पण पंचायत समितीच्या सभापती स्नेहा मेस्त्री यांनी योजना सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने ते स्थगित करण्यात आले. दरम्यान गावातील योजनेच्या विरोधकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याशी संपर्क साधून पुन्हा स्थगिती मिळवली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सुमारे २६ उपोषणकर्त्यांपैकी ७ जणांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असून भाजपचे स्थानिक नेतेही त्यांच्याबरोबर आहेत. योजना मार्गी लावण्यासाठी हा गट प्रयत्नशील असून जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. या राजकीय गटबाजीचा फटका गावाला बसला आहे.