सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे आरोग्य उजनी धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. परंतु पुणे जिल्ह्यातून सोडले जाणारे सांडपाणी याच धरणात येऊन मिसळते आणि धरणातील १२३ टीएमसी पाणी प्रदूषित होते. हेच पाणी सोलापूरकरांच्या पोटात गेल्यानंतर त्यांचे आरोग्य बिघडते. या प्रश्नाचे गांभीर्य कोणालाही वाटत नाही, अशी खंत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली.
डॉ. राजेंद्रसिंह हे जलप्रदूषणाच्या प्रश्नासंदर्भात माहिती घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी उजनी धरण परिसरास भेट देऊन तेथील जलप्रदूषणाची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत त्यांनी या धरणातील वाढत्या जलप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून त्यावर भाष्य केले. ते म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षणासाठी पुणे संपूर्ण जगात प्रसिद्ध मानले जाते. परंतु याच पुणे जिल्ह्यातील सांडपाणी मुळा, मुठा व भीमा नदीवाटे उजनी धरणात बिनदिक्कतपणे सोडले जाते. हे सांडपाणी उजनी धरणातील तब्बल १२३ टीएमसी पाण्यात मिसळते आणि हेच प्रदूषित पाणी सोलापूर जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या पोटात जाऊन त्यांचे आरोग्य बिघडते. या गंभीर प्रश्नाकडे पुणेकरांसह राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे. त्यामुळे या प्रश्नावर जनजागृती, उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले.
पुण्यातील सांडपाणी योग्य रासायनिक प्रक्रिया करून शुद्ध करून उजनी धरणात सोडायला हवे. परंतु पुण्यातील शिकले सवरलेले लोकही उजनी धरणात मैलायुक्त सांडपाणी सोडतात. सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून सोडण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेची आहे. राज्यकर्त्यांना कायद्याचा विसर पडला आहे. त्यांना कायद्याचे भानच राहिले नाही. कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्यास जलप्रदूषण होणार नाही. परंतु यात प्रशासकीय यंत्रणा अधिक जबाबदार आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. राजेंद्रसिंह यांनी सोलापूर सिद्धेश्वर तलावाचीही पाहणी केली. बाराव्या शतकातील या तलावात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण वाढले आहे. प्राणवायूअभावी हजारो मासे तडफडून मरत आहेत. अलीकडे एकाच वेळी ५५ कासवांचाही मृत्यू झाला आहे. तलावात सांडपाणी येते कोठून, याचा शोध घेतला जात नाही. त्याबद्दल डॉ. राजेंद्रसिंह यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.