नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार गोदावरी पात्रातून तेलंगणाच्या श्रीरामसागर (पोचमपाड) जलाशयात १०.०५ दलघमी पाणीसाठा सोडण्यात आला. मंगळवारी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. २८ फेब्रुवारी २०१३ मध्ये निकाल देताना पाणी सोडण्याचे आदेश दिले.

नांदेड जिल्ह्यात बाभळी बंधारा जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात उभारण्यात आला. काँग्रेसचे तत्कालीन नेते शंकरराव चव्हाण, दिवंगत आमदार बाबासाहेब गोरठेकर यांच्या पुढाकारातून व अनेकांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे धर्माबाद, बिलोली तसेच परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार होता. पण तत्कालीन आंध्र प्रदेश (आताचे तेलंगणा) राज्यात याच बंधाऱ्यावरून वाद झाला. शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. दोन्ही सरकारचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणाला पाणी देण्याचे आदेश दिले होते. दर वर्षी १ जुलै व २९ ऑक्टोबर रोजी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघण्याचे आदेश दिले होते. १ मार्च २०२५ रोजी बंधाऱ्यातील पाणीसाठ्यापैकी ०.०६ टीएमसी पाणी श्रीरामसागरात सोडावे, असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी एक दरवाजा उघडण्यात आला. त्यानंतर त्रिसदस्यीय उपस्थितीत १४ दरवाजे उघडून १०.०५ दलघमी पाणी श्रीरामसागरात सोडण्यात आले. यावेळी केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता एम.एल. फ्रँकलिन, कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोड, तेलंगणाचे कार्यकारी अभियंता एम. चक्रपाणी, सहायक कार्यकारी अभियंता के. रवी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. पोलीस प्रशासन व महावितरणच्या काही अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.