सोलापुरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा

येत्या सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा होणारे भीमा नदीवरील टाकळी औज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे शनिवारी दुपारी पूर्णक्षमतेने भरल्यामुळे शहराला आता पाच दिवसाआड नव्हे तर तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. येत्या सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे रमजान ईदच्या तोंडावर तरी शहरात अधिक पाणीटंचाई जाणवणार नाही.

सुमारे दहा लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहरासाठी उजनी धरण ते थेट सोलापूर जलवाहिनी योजनेसह विजापूर रस्त्यावर भीमा नदीवरील टाकळी येथील औज बंधारा तसेच तुळजापूर रस्त्यावरील हिप्परगा तलाव अशा तीन उद्भवांद्वारे पाणीपुरवठा  होतो. हिप्परगा तलावातील पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे तेथून होणारा पाणीपुरवठा जेमतेम स्वरूपाचा म्हणजे पाच ते सहा एमएलडी इतकाच असतो. उजनी धरण ते थेट सोलापूर जलवाहिनी आणि टाकळी औज बंधारा अशा दोन उद्भवांवर पाणीपुरवठय़ाची प्रामुख्याने भिस्त आहे. परंतु टाकळी औज बंधाऱ्यातील पाणीसाठा तर दोन ते तीन महिन्यांत एकदा संपतो आणि प्रत्येक वेळी उजनी धरणातून भीमा नदीतून टाकळी औज बंधाऱ्यात पाणी सोडावे लागते. गेल्या महिन्यात या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपला असता तो भरण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी सोलापूर महापालिकेने केली होती. परंतु धरणातून वेळेत पाणी सोडले गेले नव्हते. अखेर पालकमंत्री विजय देशमुख यांनी हस्तक्षेप केल्यानंतर उशिरा का होईना गेल्या २९ मे रोजी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. हे पाणी हळूहळू पुढे सरकत अखेर शनिवारी दुपारी टाकळी औज बंधाऱ्यात पोहोचले आणि बंधारा पूर्णक्षमतेने भरला. लगतचा चिंचपूर बंधाराही भरून घेण्यात आला. त्यामुळे पुढील  तीन महिन्यांपर्यंत शहराच्या पाणीपुरवठय़ाची समस्या मिटली आहे.

उजनी धरणातून पिण्यासाठी सोलापूर शहराला सोडण्यात आलेले पाणी मुळातच उशिरा सोडण्यात आले आणि सोडलेले पाणी टाकळी औज बंधाऱ्यात पोहोचण्यास दहा ते अकरा दिवसांचा कालावधी लागल्याने प्राप्त परिस्थितीत शहरात पाणीपुरवठा पाच दिवसाआड करण्यात आला होता. त्यामुळे ऐन पावसाळय़ातही पाण्यासाठी सोलापूरकरांना हाल सोसावे लागले. यापूर्वी दुष्काळी स्थितीतही शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा झाला नव्हता.

अलीकडे काही महिन्यांपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. आता चार दिवसाआडऐवजी किमान तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपनेही ही मागणी उचलून धरली असली तरी पालिका प्रशासनासमोर अनेक तांत्रिक अडचणी आहेत. या पाश्र्वभूमीवर येत्या सोमवारपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आखण्यात आले असले तरी ते किती प्रमाणात यशस्वी होते, याविषयी सार्वत्रिक प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water scarcity in maharashtra

ताज्या बातम्या