नगरचे पाणी नेहमीच उन्हाळ्यात पेटते. त्यात राजकारणच अधिक असते. आतादेखील तीन धरणांच्या लाभ क्षेत्रातील कालव्याच्या पाण्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात झुंडशाही सुरू झाली आहे. यामुळे पोलीस संरक्षण न मिळाल्यास सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांना द्यावा लागला आहे.
कार्यकारी अभियंत्यापासून ते कालवा निरीक्षकांपर्यंत यापूर्वी शिवीगाळ, धक्काबुक्की असे अनेक प्रकार जिल्ह्य़ात घडले. चाऱ्या फोडणे, गेट तोडणे, कार्यालयांची जाळपोळ अशा घटना झाल्यानंतर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवूनही आरोपींना राजकीय पाठबळामुळे अटक केली जात नाही. उलट जलसंपदाच्या अधिकाऱ्यांच्या मागे चौकशांचे शुक्लकाष्ठ लावले जाते. त्यामुळे आता धरणांच्या आवर्तन काळात पोलीस संरक्षण मिळाले नाही तर सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दोघा कार्यकारी अभियंत्यासह सर्व उपअभियंते, शाखा अभियंते, कालवा निरीक्षक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून काम करणे कसे कठीण आहे याचा पाढा वाचला. आदर्श असलेली जिल्ह्य़ातील पाणी वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात मागील आवर्तनात कालव्याचे पाणी पाथरवाले (ता. नेवासे) येथील पाणीवाटप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदा वळविले. जलसंपदाच्या अधिकाऱ्याना धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनाही धमकावले. पण आरोपींना अटक तर झाली नाही उलट त्यातून आंदोलने सुरू झाली. चालू आवर्तनात दोन दिवसांपूर्वी गेवराई येथे उपअभियंता एस. पी. झावरे यांना धक्काबुक्की करून दमबाजी करण्यात आली. सलाबतपूर, शिरसगाव या भागातील शेतकऱ्यांनी जमावाने येऊन हा प्रकार केला. त्यानंतर सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिला. माजी आमदार शंकर गडाख व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यात राजकीय संघर्ष तीव्र असून त्याचा पाणी प्रश्न हा एक भाग असल्याने झुंडशाही करणाऱ्यांना पाठीशी घातले जाते.
भंडारदरा धरणाच्या आवर्तनात अवघ्या मुठेवाडगावच्या (ता. श्रीरामपूर) शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही म्हणून जलसंपदाच्या कार्यालयात येऊन गोंधळ घालण्यात आला. आता कुकडी कालव्यातून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यांकरिता पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. श्रीगोंद्यात पाण्याचे राजकारण भाजपाचे माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार राहुल जगताप, काँग्रेसचे नेते व साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्यात सुरू असते. पालकमंत्री राम िशदे यांच्याविरुद्ध आंदोलने सुरू झाली आहेत. आमदार जगताप यांनी कालव्याच्या गेटचे वेिल्डग तोडून कालव्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पाचपुते, शिवसेनेचे घनशाम शेलार, जगताप हे त्यात आघाडीवर आहे.
जिल्ह्य़ात धरणांचे आवर्तन सुरू असले की, काही लोक शंभर, दोनशेच्या जमावाने येतात. पाणी वळवून नेतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमबाजी करतात. राजकारणातील बस्तान पक्के करण्याकरिता हा उद्योग सुरू आहे. त्यामुळे दोघा कार्यकारी अभियंत्यांनी व डझनभर शाखा अभियंत्यांनी बदल्या करण्याची विनंती केली आहे.
कुकडीतून शेतीसाठी पाणी देणे अशक्य
पुणे जिल्ह्य़ातील येडगाव, वरस, जोगा या धरणांमधून कुकडी कालव्यातून नगर जिल्ह्य़ाला पाणी मिळते. चार टीएमसी पाणी देणे शक्य आहे. त्याकरिता मृत पाणीसाठय़ातून पिण्याकरिता आवर्तन सोडण्यासाठी सरकारीने मंजुरी दिली. त्यापेक्षा अधिक पाणी काढणे व्यवहार्य नाही. कुकडी कालवा आठमाही आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी देणे नियमात बसत नाही. पिण्याकरिता एक टीएमसीपेक्षा कमी पाण्याची गरज आहे. तरीदेखील पिण्याच्या नावाखाली तलावात पाणी सोडण्यासाठी धरणातून जादा पाणी काढले जात आहे.
मुळाचे पाणी मिळणार, तरी आंदोलन
मुळा धरणात उपयुक्त पाणीसाठा सहा टीएमसीपेक्षा अधिक आहे. कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळणार असले तरी आधी आमच्याच चारीला पाणी सोडा अशी मागणी करत झुंडशाही केली जात आहे. बेशिस्तीमुळे हे सारे घडत असून मंत्री, वरिष्ठ अधिकारी हे सत्तारूढ पक्षाचे आमदारांमुळे झुंडशाही करणाऱ्यांवर काहीही कारवाई होत नाही. निळवंडे व भंडारदरा या दोन्ही धरणात उपयुक्त पाणीसाठा सव्वासहा टीएमसीपेक्षा अधिक आहे. आता उन्हाळी हंगामातील शेवटचे आवर्तन १ मेनंतर सोडले जाणार आहे. आवर्तनात पावणेचार टीएमसी पाणी लागेल. नंतर जुलअखेरीपर्यंत पिण्यासाठी पाणी पुरविणे शक्य होणार आहे. तरीदेखील पाण्यावरून आरोप-प्रत्यारोप तसेच प्रत्येक चारीवर आंदोलने सुरूच असतात.
झुंडशाही करण्याची प्रवृत्ती काही भागात वाढली आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळण्यापेक्षा गावात आपले राजकीय बस्तान बसावे म्हणून काही पुढारी कालवा फोडून पाणी घेतात. त्याला आंदोलनाचे स्वरूप देतात. सर्वाची भरणे होतील असे नियोजन जलसंपदा विभाग करतो. पण दमबाजी, धक्काबुक्की करण्याचे कारण शेतकरी हिताकरिता नाही. काहींच्या स्वार्थाकरिता आहे. या प्रकाराला वैतागून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, नगर
