अकोला : जिल्ह्यातील वनविभाग व वन्यजीव विभाग मिळून असलेल्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांना सध्याच्या कडक उन्हाळय़ात तहान भागवण्यासाठी सुमारे ६० कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून मनरेगा योजनेतून ३० वनतलाव तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक अर्जुना के.आर. यांनी दिली. याशिवाय वनविभागात नैसर्गिक जलस्रोतही आहेत, त्यातील पाणीही वन्यजीव हे उपलब्धतेनुसार आपली तहान भागवण्यासाठी वापरत असतात. अकोला प्रादेशिक वनविभागात चार वनपरिक्षेत्र असून त्यात अकोला, पातूर, बार्शी टाकळी, आलेगाव या वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे. त्यात ६४ नियतक्षेत्र आहेत. यात दोन सहायक वनसंरक्षक, २० वनपाल, ८० वनरक्षक कार्यरत आहेत. अकोला वन्यजीव विभागात काटेपूर्णा अभयारण्याचा अकोला जिल्ह्यात असणारा कासमार व फेट्रा या दोन वन परिमंडळांचा समावेश होतो. याशिवाय नरनाळा हा मेळघाटाचा भागही अकोला जिल्ह्याच्या हद्दीत येतो. एकंदर अकोला जिल्ह्यात ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर वने आहेत. ही वने उष्णकटीबंधीय शुष्क पानझडी वने म्हणून ओळखली जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या उन्हाच्या तीव्र झळा समस्त निसर्गाला होरपळून काढत आहेत. अशा या स्थितीत वनक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ३५ वनतळे असून ५० कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. तर अकोला वन्यजीव हद्दीत येणाऱ्या कासमार व फेट्रा मिळून १० कृत्रिम पाणवठे असे ६० कृत्रिम पाणवठे आहेत. या पाणवठय़ांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करून वन्यप्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply by forest department in artificial reservoirs to quench the thirst of wildlife zws
First published on: 16-05-2022 at 00:37 IST