टँकरवाडा अशी ओळख दरवर्षी अधिक गडद करीत जाणारा दुष्काळ मराठवाडय़ात पुन्हा दाखल झाला आहे. या वर्षी ऑगस्टच्या मध्यात १ हजार ८९० टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, टंचाई कालावधीत आतापर्यंत ४२ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. पाऊस नाहीच आला तर हा आकडा २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होऊ शकेल, असे सध्याचे टंचाईचे स्वरूप आहे. गेल्या ५ वर्षांत सर्वाधिक २ हजार ३७६ टँकर २०१३च्या जून महिन्यात सुरू होते. १ हजार ८८४ गावांना त्याद्वारे पाणीपुरवठा केला गेला.
टँकरवाडय़ातील टंचाई खर्चाचा आलेखही दिवसेंदिवस वाढणारच आहे. २०१२-१३मध्ये तब्बल २०२ कोटी रुपये टंचाईवर खर्च झाले. त्यानंतर एकदाही १५० कोटींपेक्षा कमी रक्कम खर्च झाली नाही. वाढणाऱ्या टंचाई खर्चामुळे महसूल विभागाचे हे जणू नियमित काम आहे, अशी अवस्था निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मराठवाडय़ात होणारा टँकरचा पाणीपुरवठा हा पश्चिम महाराष्ट्रातील ठेकेदारांच्या हाती आहे.
टँकरचा दर प्रतिकिलोमीटर प्रतिटन असा ठरवला जातो. औरंगाबादसह मराठवाडय़ातील बहुतांश जिल्हय़ांत प्रतिकिलोमीटर प्रतिटन १ रुपया ९० पैसे असा दर आहे. सर्वसाधारणपणे १२ मेट्रिक टनापर्यंत पाणी वाहतूक होते. म्हणजे १२ रुपये असा हा दर असतो. टनांची क्षमता, फेऱ्या आणि अंतर यात नीटसे मूल्यमापन न करता देयके अदा केली जातात. काही दिवसांपासून जीपीएस प्रणालीचा हवाला देत पारदर्शकता आणल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. मात्र, पाऊस नसल्याने टँकरची संख्या केवळ एका वर्षांत कमी दिसून येते. २०११मध्ये केवळ १६६ टँकर लावावे लागले होते. त्यानंतर सातत्याने टँकरची संख्या हजाराच्या घरात पोहोचते आहे. सन २०१२मध्ये १ हजार ८८४ गावांमध्ये पाणीटंचाई होती. या वर्षी ऑगस्टअखेर १ हजार ४२८ गावांमध्ये ऐन पावसाळय़ात टंचाई निर्माण झाली.