कराड : कराड तालुक्याच्या उत्तर- पूर्व भागाला भेडसावणारी जलटंचाई दरवर्षी अधिक तीव्र होत असतानाच दीर्घकाळ रखडलेल्या महत्वाकांक्षी हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेतील टप्पा क्रमांक एकची पाणी चाचणी अखेर यशस्वी झाली असून, पाणी वाहते करण्यात यश आले आहे.
टप्पा क्रमांक एकमधून लवकरच लाभक्षेत्रातील शेत- शिवाराला पाणी मिळणार असल्याने लाभार्थी जनतेत समाधानाची लहर पसरली आहे. लाभार्थी जनता महायुती सरकार व स्थानिक आमदार मनोज घोरपडे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे.
आमदार मनोज घोरपडे पाणी चाचणीची माहिती दिली. ते म्हणाले, युतीचे सरकार सन २०१४ मध्ये सत्तारूढ झाल्यापासून शासनाकडे हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेच्या पूर्णत्वासाठी, त्याला लागणाऱ्या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपसह ‘महायुती’च्या संबंधित मंत्र्यांनी या योजनेसाठी आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य केले. त्यामुळे आज योजनेच्या धनगरवाडी टप्पा क्रमांक एकची पाणी चाचणी पूर्ण होवून पाणीही बाहेर काढण्यात यश आल्याचे समाधान आहे.
पाण्यासाठी बहुप्रतीक्षेत असलेल्या लाभार्थी शेतकरी व नागरिकांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. अशाच पध्दतीने टप्पा क्रमांक दोन सुध्दा लवकरात लवकर पूर्ण होणार असल्याचा विश्वास देताना एकूणच ही संपूर्ण योजना पूर्ण करून, ती सातत्याने सक्षमपणे चालावी यासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी या वेळी बोलताना दिली.