पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले असतानाच गोदावरी डावाा तट कालवा तालुक्यातील ब्राह्मणगावजवळ, नाला क्रमांक २८ लगत आज, बुधवारी पहाटे भगदाड पडून फुटला, त्यामुळे शेकडो क्युसेक पाणी वाहून गेले. वाहिलेल्या पाण्यामुळे शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले. माहिती समजताच कालवा दुरुस्तीसाठी युवक नेते बिपीन कोल्हे यांनी तातडीने संजीवनी कारखान्याची जेसीबी मशीन, पोकलेन यंत्रणा पाठवून युद्धपातळीवर काम सुरू केले. पिण्याच्या पाण्यासाठी कमी वहन क्षमतेने कालवा चालू असताना त्यास भगदाड पडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ब्रिटिशकालीन गोदावरी कालव्याचे आयुर्मान १०० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे ते अनेक ठिकाणी दरवर्षी पाण्याच्या आवर्तनात फुटत असतात. त्यातून हजारो क्युसेक पाण्याची नासाडी होत असते. वर्षांनुवर्षे हे कालवे दुरुस्त करावे म्हणून आ. अशोक काळे व ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी शासनाकडे मागणी करूनही ते दुरुस्त केले गेले नाहीत. डावा कालवा ३०० क्युसेकने पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरू होता. तो बुधवारी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान ब्राह्मणगावजवळील, गाडे वस्तीलगत भगदाड पडून फुटला. त्यात गट नंबर ३३१, ३५८ मधील सुभाष गाडे (दीड एकर), नवनाथ जाधव (३ एकर), वैभव सोनवणे (अडीच एकर) यांच्या सोयाबीन पिकाची नासाडी झाली.
गोदावरी डाव्या तट कालव्याचे उपविभागीय अभियंता भास्करराव सुरळे, शाखा अभियंता बी. बी. गोसावी, कालवा निरीक्षक सुनील काळे, एन. बी. पाटील, जी. एस. पगार अधिकारी घटनास्थळी गेले. माहिती कार्यकारी अभियंता सुनील बाफना यांना कळविली. या कालव्यातून शेकडो क्युसेक पाणी आजूबाजूच्या शेतक-यांच्या शेतात तसेच नाल्यामधून वाहून गेले. त्यातून पाणी शेतात पसरले, त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.  सुरळे यांनी तातडीने कालवा बंद करण्याचे आदेश दिले, परंतु कालवा आटेस्तोवर पाणी आसपासच्या शेतांत तुंबणार आहे व कालव्यातूनही वाहत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनासाठी नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून कोपरगाव, वैजापूर, येथील नगर परिषदांचे साठवण तलाव तसेच रवंदे, टाकळी, ब्राह्मणगाव, येसगाव, संजीवनी, िशगणापूर, संवत्सर, सोमैया साकरवाडी येथील पिण्याच्या पाण्याचे तळे भरण्याचे काम सुरू आहे. कोपरगाव पालिकेचे तीन साठवण तलाव भरून देण्यात आले असून डाव्या तट कालव्यास भगदाड पडल्याने चौथा तलाव भरण्यास उशीर होणार आहे.