प्रशांत देशमुख

वर्धा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका वाहनधारकांनाही बसतो आहे. जलयुक्त पेट्रोल भरले गेल्याने चार चाकी वाहने बंद पडताहेत. यामुळे काही पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात मुसळधार पावसाची झळ सर्वांनाच बसत आहे. मात्र टणक सुरक्षा कवच असलेल्या पेट्रोलच्या टाकीलाही मुसळधार छेदून जाईल, अशी अपेक्षाही कुणी केली नसेल.

येथील ऑटोमोबाईल व्यवसायी गिरीश नाखले यांना हा अनुभव आला. पावसाळी पर्यटनास निघण्यापूर्वी त्यांनी येथील एका पंपावरून चाळीस लिटर पेट्रोल भरले, मात्र पवनारलगत येताच त्यांचे चारचाकी वाहन धुसफूस करीत बंद पडले. नवी कोरी गाडी बंद पडली म्हणून ते थक्क झाले. मात्र, वाहनाच्या ‘डॅश बोर्ड’वर पेट्रोल बिघाडाबाबत सूचना मिळाली. त्यांनी नागपूरच्या वितरकाकडे तक्रार केली. मात्र, गाडी चालू होणे अशक्य असल्याने ती “टो” करीत घरी आणावी लागल्याचे ते म्हणाले. असाच अनेकांचा अनुभव.

हे शक्य का, या प्रश्नावर येथील सर्वात जुने इंधन व्यवसायी आसिफ जाहिद म्हणाले, अतिवृष्टीत पेट्रोल टाकीत पाणी झिरपू शकते. टाकीत पेट्रोल भरण्यासाठी जे छिद्र असते, त्याला चुड्या असतात. त्यातून तसेच केबलमधून पाणी जाऊ शकते. पाण्याचा दाब तळपातळीवर वाढल्यास शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देखभाल दुरुस्ती आवश्यक ठरते, म्हणूनच काही पंप बंद आहेत.

अन्य एका पेट्रोल पंप मालकाने वेगळाच पैलू मांडला. दहा टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी मिळाली आहे, ते वातावरणातील आर्द्रता चटकन शोषून घेते. पेट्रोल हे इथेनॉल पेक्षा पातळ असल्याने ते वरच्या भागात तर इथेनॉल तळावर उतरते. टाकीतून पेट्रोल ओढणारी नळी तळाशी असते, म्हणून इथेनॉल ओढल्या जाऊन ते गाडीत भरल्या जाते. गाडीची यंत्रणा ही पेट्रोलवर चालणारी असल्याने इथेनॉलमुळे घात होतो, गाडी बंद पडते. पण त्याला नाईलाज असल्याचे या पंप मालकाने सांगितले.

अतिवृष्टीचा असा घात झाल्याने काही पंप दुरुस्तीसाठी बंद आहेत. खोलगट भागातील  सर्वच पंप बंद असल्याने जनतेची त्रेधातिरपीट उडत असल्याचे आज दिसून आले. बंद पडलेली वाहने आज नागपुरातून ट्रॉलर आल्यावर दुरुस्तीसाठी पाठविली जाणार आहेत.