मुळा व भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. भंडारदरा पाणलोटात घाटघर येथे ४२ मिमी पावसाची नोंद झाली, मात्र अन्य ठिकाणी पावसाचे प्रमाण जेमतेम होते. दरम्यान, निळवंडे धरणातून आज १ हजार ४०० क्युसेकने पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले.
मागील आठवडय़ात धरण परिसरात पावसाचे आगमन झाले, मात्र अजूनही पावसाने जोर पकडलेला नाही. सकाळपर्यंत २४ तासांत पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. रतनवाडी ११, पांजरे ६, वाकी ४, घाटघर ४२. तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस नाही. पुरेसा पाऊस नसल्याने मुळा नदी  वाहती झालेली नाही. मागील वर्षी सोळा जूनला अंबीत धरण ओव्हरफ्लो होऊन मुळा वाहू लागली होती.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जेमतेम आहे. धरणात ५० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. गतवर्षी याच कालावधीत धरणात ३५० दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले होते.
दुपारी १२ वाजता १ हजार ४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्या वेळी धरणातील साठा ५९९ दशलक्ष घनफूट होता तर भंडारदरा धरणात १ हजार ३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे. या आवर्तनात ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे.