करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून देशासह राज्यातील सर्वच शाळा बंद आहे. ऑनलाईन वर्गांच्या माध्यमातून सध्या विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे. मात्र, आता प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे. “नववीपासून पुढचे सगळे वर्ग नियमित सुरु करा”, अशी मागणी शिक्षण संस्था महामंडळाने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. आठवड्यातून ४ दिवस ४ तास वर्ग सुरु ठेवू द्या. आम्ही मुलांची जबाबदारी स्वीकारतो, अशी ग्वाही देखील यावेळी या शिक्षण संस्था महामंडळाने दिली आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीतील काही प्रमाणात त्रुटी आणि मर्यादा समोर येत आहेत. त्यामुळे, आता लवकरात लवकर प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याची ही मागणी होत आहेत.

Online Education : किती विद्यार्थी ऑनलाइन शिकतात? आकडेवारी वाचून धक्काच बसेल

मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातली महाविद्यालयं सुरु करण्याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. उदय सामंत म्हणाले कि, १ नोव्हेंबरपासून राज्यातली सर्व महाविद्यालयं सुरू कऱण्याचा आमचा मानस असून त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करत आहोत. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत सीईटी परीक्षा घेतल्या जातील. सीईटी परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.ते आज (७ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यामुळे, साधारणतः दीड वर्षाच्या काळानंतर पुन्हा एकदा महाविद्यालयं सुरु करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचं दिसत आहे.

ऑनलाइन शिक्षणाची मर्यादित पोहोच

करोनामुळे गेले कित्येक महिने बंद असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांवर आणि विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागांतील फक्त ८ टक्के विद्यार्थी हे नियमितपणे ऑनलाइन अभ्यास करतात. तर शहरी भागातील २४ टक्के विद्यार्थी नियमितपणे ऑनलाइन अभ्यास करतात. ऑनलाइन शिक्षणाची अत्यंत मर्यादित असलेली पोहोच ही यामागचं प्रमुख कारण आहे.