देशात सध्या भाजपाविरोधी वातावरण आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये तोडफोड करुन सत्ता मिळवली गेली आहे. सध्याचा जो ट्रेंड आहे तो भाजपा विरोधी आहे. त्यामुळे असाच ट्रेंड कायम राहिला तर २०२४ मध्ये देशाचं चित्र बदलेलं दिसेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. याचविषयी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता निवडणुका आल्या की शरद पवार काय बोलतात ते डायलॉग्ज आम्हाला पाठ झाले आहेत असा टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

“ट्रेंड बदलण्याची स्वप्नं पवारसाहेब वर्षानुवर्षे पाहात आहेत. २०१४, २०१९ लाही त्यांनी लोकसभा निवडणुकीत ही स्वप्न पाहिलं. विधानसभेतही पाहिली. पण ती काही पूर्ण झाली नाहीत. तसंच मी तुम्हाला सांगतो हे जे डायलॉग तुम्ही पवारसाहेबांचे सांगत आहात असेच २०१४ मध्ये होते, २०१९ मध्ये होते. निवडणुका आल्या की शरद पवारांचे डायलॉग काय असतील याची आम्हाला सवय झाली आहे. देशभरात मोदी विरोधी वातावरण आहे म्हणत आहेत कुठे आहे मोदीविरोधी वातावरण? ३०० पेक्षा जास्त लोक निवडणून आले तरीही मोदीविरोधी वातावरण दिसतं आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे बोलत आहेत. “

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“तुम्हाला आत्तापर्यंतचा इतिहास माहित आहेच की शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं. आत्ता ते देशात मोदीविरोधी वातावरण आहे म्हणत आहेत.” असं हसत एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई विमातळाच्या कामाची हवाई पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच नवी मुंबई विमानतळ लवकरच लोकांसाठी खुला होईल या दृष्टीने आमचं काम सुरु आहे अशीही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We are used to sharad pawar dialogues when elections are there said devendra fadnavis scj
First published on: 07-06-2023 at 10:56 IST