Sanjay Raut on BMC Elections 2026 : राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचारसभांना वेग आलाय. अनेक माध्यमांनीही नेत्यांच्या मुलाखतींचा सिलसिला सुरू ठेवला आहे. अनेक नेतेमंडळीही मुलाखतींनाच प्राधान्य देऊन जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, गेल्या २५ वर्षांपासून मुंबई पालिकेची सत्ता असलेल्या शिवसेनेला पुन्हा निवडून येण्याची आशा आहे. तसंच, आजही मुंबईवर आमचीच सत्ता असल्याचं शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. ते एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात बोलत होते.

महाविकास आघाडी घडवण्यामागे आणि राज-उद्धव ठाकरे मनोमिलन करण्यामागे तुम्हीच आहात. राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यामागे काय कहाणी आहे? असं विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, यामागे कहाणी अशी काहीच नाही. २०१९ मध्ये शरद पवार आणि आमची आघाडी झाली. भारताच्या लोकशाहीत कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नाही. मतभेद असू शकतात, विचारधारा वेगळ्या असू शकतात. पण राज्य आणि देशाच्या हिताची वेळ येते तेव्हा काही गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात. आमचा (भाजपाबरोबरचा) डीएनएही एक होता, पण जेव्हा सरकार स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा भाजपाने आमच्याशी चर्चाही केली नाही. तुम्ही शिवसेनेत फूट पाडून तुम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवले, दोन उपमुख्यमंत्री बनवले. पण २०१९ मध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री पदही आम्हाला द्यायला तयार नव्हता. मग अशावेळी आम्ही करायला हवं होतं? तेव्हा समोर शरद पवार आणि काँग्रेस होती, त्यांनाही सत्ता हवी होती. त्यामुळे आम्ही एकत्र आलो.”

…तर मी स्वतःला भाग्यवान समजेन

“आता २०२६ मध्ये राज आणि उद्धव एकत्र आले. ते दोघेही भाऊ आहेत, आम्ही मध्ये येण्याचं कारणच काय? दोघांच्या आई एकमेकांच्या सख्ख्या बहिणी आहेत. मी दोघांचाही मित्र आहे. खूप जुना मित्र आहे. त्यामुळे माझी थोडीफार त्यांना मदत झाली तर मी स्वतःला भाग्यशाली समजेन. ठाकरे कुटुंबियांमुळेच मी आज इथे बसलो आहे”, असंही संजय राऊत कृतज्ञतेने म्हणाले.

द्वेषाचं राजकारण देशात चालणार नाही

“शिवसेनेने नेहमीच मुंबईत समतोल भूमिका घेतली आहे. काँग्रेससोबत आमचं वैचारिक मिलन नव्हतं. पण जेव्हा आम्ही एकत्र आलो, तेव्हा त्यांनी आमचं हिंदुत्व स्विकारलं आणि त्यांचा सेक्युलरपणा आम्ही स्विकारला. राज ठाकरे आमच्याबरोबर आले आहेत, काही गोष्टी आम्हालाही नाही आवडत त्या त्यांना सोडाव्या लागतील. द्वेषाचं राजकारण या देशात चालणार नाही. यात हिंदू, मुसलमान, जैन, पारशी आहेत. तुम्ही त्या पातळीवर जाऊन द्वेषाचं राजकारण करू शकत नाही. तुम्ही तुमची विचारधारा घेऊन पुढे जाऊ शकता. त्या पातळीपर्यंत नाही जाऊ शकत ज्यामुळे देश तुटेल किंवा मोठी दरी निर्माण होईल”, असं संजय राऊत म्हणाले.

आम्ही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतो

मुंबई पालिका हातातून गेली तर शिवसेनेचं (उद्धव ठाकरे) राजकीय भविष्य संपेल असं वाटतं का? यावर संजय राऊत म्हणाले, “ठाकरे कधीच हद्दपार होणार नाहीत. आम्ही खूप निवडणुका हरलो आहोत, आम्ही खूप कमी निवडणुका जिंकलो आहोत. निवडणुकीत हार-जीत होत असते. आमचं संघटन मजबूत आहे. आजही आम्ही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतो. ही आमची सर्वांत मोठी अचिव्हमेंट आहे.”

“ठाकरे वाचले तर मराठी माणूस आणि मुंबई वाचेल. हे सर्वांना माहीत आहे. हे देवेंद्र फडणवीसांनाही माहीतेय, विनोद तावडेंनाही माहितेय”, हेही त्यांनी अधोरेखित केलं.