गणेशोत्सव किंवा सार्वजनिक उत्सावात डिजे किंवा लाऊडस्पीकर वापरावर बंदी आणावी, अशी मागणी पुण्यातील विद्यानंद बापट यांनी केली असून गेल्या काही दिवसांपासून ते याबद्दल आग्रही भूमिका मांडत आहेत. याबद्दल आज टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना संतोष चव्हाण नावाच्या एका तरुणाने त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. आता या प्रकरणी विद्यानंद बापट यांच्या आई वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
विद्यानंद बापट यांचे वडील काय म्हणाले?
“डीजे मुक्त गणेशोत्सव ही जी मागणी विद्यानंदने केली आहे ती योग्यच आहे. पण आज जी मारहाण झाली त्याचा मी निषेध करतो. विद्यानंदची भूमिका योग्यच आहे. कारण कुठल्याही एका समाजाबाबत तो बोलला नाही. त्याची भूमिका योग्य आहे. आत्ता संपर्क झालेला नाही. मी टीव्हीवर पाहिलं की ससून हॉस्पिटलमध्ये विद्यानंदला नेलं आहे. त्यांचा आवाज डी. जे. मुक्त गणपतीसाठीच आहे. पण मुद्दे चर्चेने सोडवता येतात.”
विद्यानंद बापट यांच्या आईने काय म्हटलं आहे?
जी घटना घडली ते आम्हाला टीव्हीवरच कळली. आमचे नातेवाईक पुण्यात आहेत. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. विद्यानंदला ससूनमध्ये नेलं आहे. चर्चा करता आली असती, मारहाण करणं चुकीचं आहे. ती योग्य नाही. डी.जे. विरोधात भूमिका घेतली आहे त्याबाबत आम्ही त्याच्या पाठिशी आहोत असं कल्पना बापट यांनी म्हटलं आहे. ध्वनी प्रदूषणाचा आम्हालाही त्रास झाला आहे. आम्हीही तिथे राहात होतो. आता विद्यानंदवर भ्याड हल्ला करण्यात आला, त्याला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी विद्यानंद बापट यांच्या आईने केली आहे. डीजेमुक्त गणेश उत्सव या विद्यानंदच्या भूमिकेच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत अशी भूमिका विद्यानंद बापट यांच्या आई वडिलांनी घेतली आहे. या दोघांनीही टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला त्यावेळी ही भूमिका मांडली आहे
नेमकं काय घडलं?
पुण्यातील सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे आणि लाऊडस्पीकरच्या अमर्याद वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी ठाम मागणी विद्यानंद बापट गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. याच मुद्द्यावर ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. प्रत्यक्ष थेट प्रक्षेपण सुरू असतानाच गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण तिथे आला. “तुला यावर आक्षेप घ्यायला कोणी सांगितलं?” असा सवाल करत त्याने बापट यांच्याशी हुज्जत घातली. “मला याला आणखी दोन मारू द्या,” असे म्हणत त्याने थेट बापट यांच्यावर हात उगारला आणि मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया
हल्ल्याच्या या घटनेनंतर बोलताना विद्यानंद बापट यांनी ‘टीव्ही ९’ मराठीला प्रतिक्रिया दिली. बापट म्हणाले, “सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक वेडा माणूस आला आणि त्याने हा प्रकार केला. त्याला केवळ प्रसिद्धीच्या झोतात यायचे होते.”
