पुण्यात डीजेबंदीविरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला आहे. डीजे आणि लाऊड स्पीकर बंद झाले पाहिजेत कारण त्याचा लोकांना त्रास होतो. सण उत्सव हे साजरे करायचे असतील तर ते लोकांना त्रास न होता साजरे झाले पाहिजेत असंही विद्यानंद बापट यांचं म्हणणं आहे. बहुतांश पुणेकरांनीही या गोष्टीला पाठिंबा दिला आहे. रविवारी पुण्यात एका मोर्चाचंही आयोजन करण्यात आलं होतं. आता खासदार संजय राऊत यांनीही विद्यानंद बापट यांची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं आहे.
अफझल खानाचा कोथळा काढला गेला तेव्हा डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता-संजय राऊत
यादवी सुरु आहे की काय? या राज्यात असा प्रश्न पडला आहे. कारण प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा आणि शाहिस्तेखानाची बोटं छाटली तेव्हा डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता. लोकमान्य टिळकांची मंडालेहून सुटका झाली आणि ते पुण्यात आले तेव्हाही त्यांच्या स्वागतासाठी डीजे वाजला नव्हता. नव्या संस्कृती रक्षकांनी हे समजून घेतलं पाहिजे. राज ठाकरे जे म्हणत आहेत ते योग्यच आहे. ही काही आपली संस्कृती नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर उत्तरेचं अतिक्रमण होता कामा नये.
ठाण्यात दहीहंडीच्या व्यासपीठावर गौतमी पाटीलला कुणी नाचवलं?
ठाण्यात दहीहंडीच्या व्यासपीठावर गौतमी पाटीलला कुणी नाचवलं? लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण दहीहंडीच्या व्यासपीठावर हिडिस नृत्य सुरु होतं ते कुणी केलं याकडे जरा देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिलं पाहिजे. संस्कृती रक्षकांच्या नावाखाली जे सुपारी किलर्स फिरत आहेत त्यांना फडणवीसांनी आवरलं पाहिजे. तुम्ही आवरणार नसाल तर राज्य कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत अपयशी ठरतं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हिंदू खतरेमें वगैरे कसे काय? मागच्या दहा वर्षांत हेच सांगितलं जातं आहे. सगळ्या प्रश्नांचं उत्तर जय श्रीराम आणि हिंदू खतरे में कसं? कुणी म्हटलं हिंदूंना खतरा आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत ना? प्रति हिंदूहृदय सम्राट, कारण मूळ हिंदूहृदय सम्राट फक्त बाळासाहेब ठाकरेच. हे जे प्रति केले आहेत, महाराष्ट्रात काही चिल्लर हिंदूहृदय सम्राट आहेत. ते सांगतात म्हणून हिंदू खतरेमें का? खटले आमच्यावर आहेत. श्रीकृष्ण आयोगाचे, बाबरीचे सगळे खटले आमच्यावर आहेत असंही संजय राऊत म्हणाले. काल पुण्यात जे डीजे विरोधात उतरले ते पण हिंदुत्ववादी आहेत त्यांनाही हिंदुत्वाचंच रक्षण करायचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
