मुंबईत नुकताच ६२ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकारांचा सन्मान करण्यात आला आहे. २०२५ चा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ गायक-संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला आहे. र्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिला प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
अत्यंत सुंदर असा पुरस्कार सोहळा आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आपण अशा व्यक्तीला प्रदान केला ज्यामुळे या पुरस्काराचं महत्व वाढलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर हे असं नाव आहे की ज्यांनी अखंड संगीताची सेवा केली. कशा पद्धतीने मंगेशकर कुटुंबाने अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून पुढे आलं हे त्यांनी सांगितलं. पण त्यांनी संगीताची सेवा केली. लतादीदी, आशाताई अशा भगिनी असताना आपली वेगळी छाप तयार करणं, वेगळं विश्व तयार करणं हे कठीण काम होतं ते हृदयनाथ मंगेशकर यांनी करुन दाखवलं. ज्ञानेश्वर माऊली हे त्यांचं दैवत आहेत, वीर सावरकर त्यांचे दैवत आहेत आणि छत्रपती शिवरायही त्यांचे दैवत आहेत. या सगळ्याच्या माध्यमातून अभिजात संगीत हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्यापर्यंत पोहचवलं असं मुख्यमंत्री म्हणाले. आपल्या याच भाषणात राणी मुखर्जी यांच्याबाबत एक तक्रार आहे म्हणत मिश्किल विधान केलं.
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी सलीम खान यांचंही कौतुक केलं. एक नायक घडवणारे लेखक असं त्यांचं कार्य आहे. शोले हा त्यांनी लिहिलेला सिनेमा तर सहस्त्रकातील एक सुंदर सिनेमा आहे. मला जर खासगीत विचारलंत तर मी किमान शोलेतले ५० डायलॉग्ज म्हणून दाखवेन इतक्यांदा तो सिनेमा मी पाहिला आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.
राणी मुखर्जींबाबत एक तक्रार आहे..
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राणी मुखर्जींनी ३० वर्षांपूर्वी एक वेगळ्या प्रकारचा झंझावात हिंदी चित्रपटसृष्टीत आणला, नंतर मग स्त्री केंद्रीत भूमिकांकडे त्यांचं लक्ष केंद्रीत झालं. भूमिकेतली सत्यता शोधून त्यांनी भूमिका निवडल्या. मर्दानीमुळे स्त्री केंद्रित पात्रही लोकांना भावलं. त्यांना पुरस्कार मिळणार आहे हे समजल्यावर आपल्या पर्यटन विभागाने मला सांगितलं की त्यांना एक तक्रार करा. ती तक्रार अशी आहे की त्यांनी केवळ खंडाळ्याचं प्रमोशन केलं आहे. इतके वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं आपल्याकडे आहेत त्याचं प्रमोशन कधी करणार आहेत ते आपण नक्की विचारु असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

प्रसाद ओक म्हटलं की धर्मवीर आनंद दिघे ही भूमिकाच आठवणार
अभिनेते प्रसाद ओक हे 360 डिग्री अभिनेते आहेत. अत्यंत जीव ओतून ते काम करत असतात. तुकाराम महाराज म्हटलं की जसे आपल्याला विष्णुपंत पागनीस आठवतात, इरसाल राजकारणी म्हटलं की निळू फुले आठवतात तसं धर्मवीर आनंद दिघे म्हटलं की प्रसाद ओकच आठवणार. इतकी समरस होऊन त्यांनी धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांना ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्या मनात आनंद दिघेंची प्रतिमा म्हणजे प्रसाद ओकच असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद ओक यांचं कौतुक केलं.
