Chhagan Bhujbal on NCP Merger : अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा कोणाकडे जाणार? दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का? यावर प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यातच, १७ जानेवारीचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असती तर अजित पवारांनी मला सांगितलं असतं असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. त्यामुळे भाजपाला विचारल्याशिवाय असा निर्णय घेता येणार नाही, असं मंत्री छगन भुजबळ म्हणालेत. ते आज माध्यमांशी बोलत होते.
“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशी अनेकांची इच्छा आहे. ठाकरे एकत्र आले मग पवारही यावेत. परंतु, अशा काही चर्चा झाल्या की नाही याची कल्पना नाही. मुख्यमत्र्यांनीही सांगितलं की त्यांच्याशी अजित पवारांनी यासंदर्भात काहीही सांगितलं नव्हतं. तसंच, आम्हालाही याची कल्पना नाही. हे सर्व करायचं म्हणजे भाजपाबरोबर राहून करायचं आहे, त्यामुळे त्यांना विचारलं पाहिजे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाजपाच्या ज्येष्ठ मंडळींनाही विचारावं लागेल. दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाबाबत काय बोलणं झालं, कोणाबरोबर बोलणं झालं हे माझ्यासहित कोणालाही माहित नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विचारावंल लागेल, कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत. सरकारमधून बाहेर पडायचं असेल तर भाग वेगळा”, असंही ते म्हणाले.
सुनेत्रा पवारांनी होकार दिल्यानंतरच शपथविधीचा कार्यक्रम झाला
कोणाचा स्वार्थ आहे आणि कोणाचा नाही हे जनता ठरवेल. सुनेत्रा ताईंचा शपथविधी झाला, अनेकांनी टीकेची सूर लावले. पण सुनेत्रा पवारांना विचारूनच हा कार्यक्रम झाला. त्यांच्याशिवाय कोणतंही नाव चर्चेत नव्हतं. सुनेत्रा पवारांनी संमती दिली, विधानमंडळ आणि आमदारांची परवानगी होती. मुख्यमंत्र्यांनी याबाबत राज्यपालांना सांगितलं. हे दोन ते तीन घट महत्त्वाचे आहेत. या सर्वांनी एकसुराने होकार दिला, त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम झाला, असंही छगन भुजबळ म्हणाले.

