आम्हाला महात्मा गांधी आणि पंडित नेहरु यांच्याविषयी आदर आहे. मात्र कोणीही वीर सावरकरांचा अपमान करु नये. बुद्धीमान लोकांना याबाबत वेगळं काही सांगण्याची गरज नाही. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाहीत तर देशाचे दैवत आहेत. सावरकर या नावातच राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहेत. नेहरु-गांधी यांच्याप्रमाणेच वीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा इथे कोणतीही तडजोड नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्यांचा अपमान सहन करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी भाष्य केलं. आज दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या देश बचाव रॅलीमध्ये “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं. शिवसेनेने सावरकर यांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे वीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे. तीन पक्षांचं हे सरकार असल्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत शिवसेना काय म्हणणे मांडणार हे पाहणे महत्त्वाचे होते. त्यानुसार आता संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका समोर आणली आहे. एक ट्विट करुन त्यांनी वीर सावरकर यांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही असे म्हटलं आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरु यांच्याबाबत शिवसेनेला आदर आहे. मात्र वीर सावरकर यांचा अनादर शिवसेना कधीही सहन करणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या आशयाचं ट्विट करुन त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे.