कराड : एकाद्या निवडणुकीत यश मिळाले म्हणजे त्या पक्षाच्या विचाराचे मतदार तयार झाले, असे होत नाही. पूर्वी नितीमुल्य जपणारी नेतेमंडळी होती. त्या पध्दतीचे भाजपच्या विचारधारेवर आधारित राजकारण पुढे आणायचे आहे. सगळ्यांना बरोबर घेवून नव्या जुन्यांचा मेळ घालत स्थानिक निवडणुका जिंकायच्या असल्याचे भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले. आता भोसले गट असा विषय राहिलेला नसून, ‘सब कुछ भाजप’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर डॉ. भोसले यांचे कराडमध्ये आगमन होताच त्यांचे सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आले. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. माजी आमदार आनंदराव पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, विक्रम पावसकर, सुदर्शन पाटसकर, एकनाथ बागडी यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. भोसले म्हणाले, यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी राजकारण करण्याची सातारा जिल्ह्याची परंपरा आहे. त्यानुसार सुसंस्कृत राजकारण करत वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा खऱ्या अर्थाने भाजपचा बालेकिल्ला करणार असल्याचा निर्धार आमदार त्यांनी व्यक्त केला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘महायुती’च्या माध्यमातून लढण्याचा निर्णय तिन्ही पक्षातील नेत्यांनी घेतला आहे. पण, एखाद्या ठिकाणी महायुती म्हणून लढत झाली नाही तर, तिथे स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून योग्य निर्णय घेतला जाईल. तरीही भाजप सर्वांना बरोबर घेऊन महायुती सरकारला पोषक अशा पद्धतीने स्थानिक निवडणुका जिंकून सत्तेच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
सहकारी संस्थांच्या निवडणुकीत भाजप वेगवेगळ्या आघाडयांसोबत जरी दिसला असली तरी त्या पक्षीय चिन्हावरील निवडणुका नाहीत. संस्थेशी निगडीत तेथील विषय, राजकारण असते डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांनी महायुती म्हणून निवडणुका लढण्याचे संकेत दिलेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ठेवायच्या की नाहीत, हे स्थानिक नेते ठरवतील. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वाना बरोबर घेवून जिंकूच असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत मदत केलेल्यांचा समतोल साधण्याचे आव्हान आपल्यासमोर नक्की असेल. परंतु, योग्य पद्धतीने ते पेलण्याचा प्रयत्न राहील. विधानसभा निवडणूक या स्थानिक प्रश्नांबरोबर राज्याच्या प्रश्नावर असतात. वरिष्ठ पातळीवरून निधी व योजना आणून विकास व्हावा, यादृष्टीने त्यासाठी मतदान होते. त्यादृष्टीने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.