scorecardresearch

आता संजय राऊतही म्हणतात, ‘आम्ही पुन्हा येणार’

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपा सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे.

sanjay-raut-devendra-fadnavis
संजय राऊतांचा भाजपाला इशारा

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्य़ानंतर महाविकासा आघाडी सरकार कोलमडले आहे. भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला असून देवेंद्र फडणवीस येत्या २४ तासांमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या या सत्ताबदलावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. ‘आम्ही पुन्हा येणार’ असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांच्याच स्टाईलमध्ये भाजपाला इशारा दिला आहे.

‘शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. शिवसेनेसाठी सत्ता जन्माला आली आहे. हा बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र आहे. आम्ही पुन्हा स्वबळावर काम करु आणि सत्तेत येऊ’, असा इशाराही संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “ज्या दिवशी नशिबालाच…”

उद्धव ठाकरेंचा राजीनामा

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारने बहुमत गमावले असल्याचे पत्र भाजपाने राज्यपालांने दिले होते. त्यानुसार राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. या बहुमत चाचणीस शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि राजभवन गाठतं राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त केला.

हेही वाचा- संजय राऊतांनी शेअर केला ‘पाठीवर वार’ झाल्याचा फोटो; नितेश राणे उत्तर देत म्हणाले “रिटर्न गिफ्ट”

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आता विरोधी पक्ष नेते असणारे देवेंद्र फडणवीस हे उद्या म्हणजेच शुक्रवारी, १ जुलै रोजी राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या काही महत्वाच्या बैठकी आज पार पडणार आहेत. सायंकाळपर्यंत सत्तास्थापनेसंदर्भातील चित्र अधिस स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे फडणवीस हे उद्या म्हणजेच जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी शपथ घेतील असंही म्हटलं जातंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: We will come again says sanjay raut in fadnavis style dpj

ताज्या बातम्या