“राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू..;” शिवसेना खासदार संजय जाधवांचं खळबळजनक विधान

शेवटी काही मर्यादा असतात कुठं पर्यंत शांत बसायचं आहे कुठं पर्यंत सहन करायचं आहे, असे खासदार संजय जाधव यांनी म्हटलं आहे

We will drown NCP Shiv Sena MP Sanjay Jadhav controversy over appointment of District Collector
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद समोर आला आहे. (फोटो सौजन्य : south central railway / Twitter)
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद समोर आला आहे. पदनियुक्तीनंतर घडलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी पदावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती होऊ नये यासाठी शिवसेना खासदाराने थेट मंत्रायात लॉबिंग केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय जाधव यांनी या नियुक्तीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो असे वक्तव्य संजय जाधव यांनी केलं आहे.

“जेव्हा माकडीण सुद्धा स्वतः बुडायची वेळ आली तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते तर लक्षात ठेवा राष्ट्रवादीला आम्ही कधीही घालू. शेवटी आता खूप सहनशक्तीच्या पलीकडे गेलो. काल फक्त कलेक्टर बदलायचा होता तर मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. पण त्या राष्ट्रवादीवाल्यांनी एवढं रान पेटवलं जसे काही मोठा अपराध केला. आपलं घ्यायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी राष्ट्रवादीवाल्यांची अवस्था आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही मान्य केला आहे. शेवटी काही मर्यादा असतात कुठं पर्यंत शांत बसायचं आहे कुठं पर्यंत सहन करायचं आहे, असं संजय जाधव यांनी म्हटलं आहे. शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर ३१ जुलैला आंचल गोयल या पदभार स्वीकारतील हे अपेक्षित होते. पदभार स्वीकारण्यासाठी त्या दोन दिवस आधी येथे आल्या. मात्र अचानक आपण अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवावा असा संदेश मुगळीकर यांना सामान्य प्रशासन विभागाकडून आला. गोयल यांना परत जावे लागले. या सर्व प्रकाराची माध्यमांनी दखल घेतली. समाजमाध्यमावरही लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.

परभणीच्या पुढाऱ्यांना केवळ आपल्या तालावर कारभार करणारे मर्जीतले रबरी शिक्केच हवे आहेत अशी सार्वत्रिक भावना तयार झाली होती. निदर्शने केली गेली. जागरूक नागरिक आघाडी या नावाने लोक एकवटल्यानंतर २४ तासांच्या आत अंचल गोयल याच जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारतील, असे पालकमंत्र्यांना जाहीर करावे लागले. तसे स्पष्टीकरण पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिल्याने या विषयाला  पूर्णविराम मिळाला होता.  तरी जिल्ह्यात यापूर्वी अधिकारी विरुद्ध पुढारी असे झडलेले अनेक संघर्ष यानिमित्ताने समोर आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: We will drown ncp shiv sena mp sanjay jadhav controversy over appointment of district collector abn