तासगाव-कवठेमहांकाळ भाजपला हवा असेल तर आम्हाला सांगली मतदारसंघ सोडावा लागेल. असे मत शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भगव्या लाटेमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.
    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर दिवाकर रावते यांनी आज शिवसनिकांशी बठक आयोजित केली होती. या वेळी शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकत्रे स्थानिक निवडणुकीमध्ये शिवसेनेची साथ सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करीत असल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हय़ातील पाच जागांवर शिवसेना लढविण्यास सज्ज असून हे मतदारसंघ आमच्याच वाटय़ाला हवेत अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
    पत्रकारांशी बोलताना रावते यांनी सांगितले, की काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आघाडीला धोबीपछाड केले असून, त्याचा निश्चितच परिणाम विधानसभा निवडणुकीवरही दिसून आल्याशिवाय राहणार नाही. सेनेच्या वाटय़ाला येणाऱ्या मतदारसंघात एखाद्या ठिकाणी कमकुवत उमेदवार असेल तर अन्य पक्षातून शिवसेनेत येणाऱ्या नेत्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल असेही रावते यांनी सांगितले.