Praful Patel On Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात निधन झालं आहे. एका खासगी विमानाने अजित पवार मुंबईवरून बारामतीला जात होते. यावेळी बारामतीत विमानाच्या लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला आणि यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत, तर राज्यातील अनेक नेते ढसाढसा रडत आहेत.

दरम्यान, बारामती विमान दुर्घटनेच्या आदल्या रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोनवर बोलेले होते. यावेळी नेमकं काय संवाद झाला होता? याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. ‘प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही, मी काही दिवस बाहेर जातोय’ असं अजित पवार यांनी फोनवर बोलताना म्हटलं होतं, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

“अजित पवार यांच्या विमानाने दोन वेळा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिसऱ्यावेळी लँडिंग करताना विमानाचा अपघात झाला. खूप दु:खद घटना आहे. आम्हाला अद्यापही विश्वास बसत नाही. आम्ही सगळेच दिल्लीत होतो. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे, मी आम्ही सगळेच दिल्लीत होतो. पण ही घटना घडल्याची माहिती मिळताच आम्ही बारामतीत दाखल झालो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी न भरून येणारं नुकसान झालं आहे. या घटनेबाबत अजूनही विश्वास बसत नाही”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

“काल रात्रीच आठ ते साडेआठच्या सुमारास माझं आणि अजित पवार यांचं फोनवर बोलणं झालं होतं. आमचं जे काही कामाचं बोलणं होतं ते झालं आणि शेवटी-शेवटी ते असंही म्हणाले की प्रफुल्ल, ‘आता आपली भेट होणार नाही, कारण मी आठ ते दहा दिवस बाहेर आहे.’ भेट होणार नाही असं ते म्हणाले आणि अक्षरशः तसंच घडलं”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

निलेश लंके आणि अमोल मिटकरींचा आक्रोश

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे आमदार अमोल मिटकरी आणि खासदार निलेश लंके यांनी तर आक्रोश करत टाहो फोडला आहे. अमोल मिटकरी आणि निलेश लंके या दोघांचाही आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेतल्यानंतर निलेश लंके आणि अमोल मिटकरी ढसाढसा रडले आहेत.

सुप्रिया सुळे ढसाढसा रडल्या

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सुप्रिया सुळे, शरद पवार, सुनेत्रा पवार हे सगळे दिल्लीहून बारामतीत पोहोचले. बारामतीत पोहोचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार हे ढसाढसा रडल्या. सुप्रिया सुळे या विठ्ठलदादा मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचा उल्लेख तुमचा एकदम लाडला असा उल्लेख केला. यानंतर त्या मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. सुनेत्रा पवार यांना देखील अश्रू थांबवता आले नाहीत.