scorecardresearch

मुख्यमंत्र्यांचे मध्यावधी निवडणुकीचे मनसुबे उधळून लावू- उद्धव ठाकरे

कर्जमाफीची अंमलबजावणी होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहील.

मुख्यमंत्र्यांचे मध्यावधी निवडणुकीचे मनसुबे उधळून लावू- उद्धव ठाकरे
uddhav thackeray : भाजपकडे मध्यावधी निवडणुकांसाठी एवढाच पैसा असेल तर तो त्यांनी शेतकऱ्यांना द्यावा. त्या मोबदल्यात शिवसेना तुम्हाला पाठिंबा देईल.

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला फाटा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मध्यावधी निवडणुकीचे मनसुबे आखण्यात येत असतील तर ते आम्ही उधळून लावू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते गुरूवारी बुलडाण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्जमाफीची अंमलबजावणी होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सरकारला कदाचित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयाला बगल द्यायची आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून मध्यावधी निवडणुका घेण्याची भाषा सुरू झाली आहे. भाजपकडे मध्यावधी निवडणुकांसाठी एवढाच पैसा असेल तर तो त्यांनी शेतकऱ्यांना द्यावा. त्या मोबदल्यात शिवसेना तुम्हाला पाठिंबा देईल. मात्र, कर्जमाफी टाळण्यासाठी मध्यावधी निवडणुका घ्यायचे मुख्यमंत्र्यांचे मनसुबे असतील, तर ते यशस्वी होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उद्धव यांना काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या राजकीय भूकंपाच्या विधानाबद्दलही विचारण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव यांनी कर्जमाफी न झाल्यास राज्यात भूकंप होणारच, असे ठासून सांगितले.

तातडीच्या मदतीला बँकाचा आक्षेप

सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप बाकी आहे. याबाबतचे निकष ठरवण्यासाठी सध्या सरकारकडून शब्दांचे खेळ सुरू आहेत. मात्र, शिवसेनेला त्याच्याशी काही घेणेदेणे नाही. सरकारला कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याची ताकद व सुबुद्धी मिळो, एवढीच प्रार्थना मी करतो. यावेळी उद्धव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना लक्ष्य केले. आपला देश कृषीप्रधान असूनही शेतकऱ्यांना तुच्छतेची वागणूक दिली जाते. मात्र, ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला त्यांना शेतकऱ्यांनी त्यांची जागा दाखवून दिली. अजित पवारांनाही शेतकऱ्यांनी इंगा दाखवला आणि आता ‘साले’ म्हणणाऱ्यांनाही शेतकरी अद्दल घडवतील, असे सांगत उद्धव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेने सत्तेची पर्वा न करता कर्जमाफीच्या निर्णयाला सुरूवातीपासूनच पाठिंबा दिला. कर्जमाफीची अंमलबजावणी होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबतच राहील. शेतकऱ्यांनी आंदोलनाच्यानिमित्ताने चांगली एकजूट दाखवून दिली. ही एकजूट त्यांनी कायम ठेवावी. शिवसेना कायमच त्यांच्या पाठिशी असेल. सरकारमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवणे, हीच शिवसेनेची भूमिका असल्याचे उद्धव यांनी सांगितले. यावेळी उद्धव यांनी जिल्हा बँकांवर लादण्यात आलेल्या बंदीसंदर्भातही भाष्य केले. जिल्हा बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या बँकांवर लादलेल्या निर्बंधामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने यामधील दोषींवर जरूर कारवाई करावी. मात्र, त्यासाठी संपूर्ण व्यवस्था मोडून टाकणे योग्य नसल्याचे उद्धव यांनी सांगितले.

कर्जमाफीसाठी अटी नकोत!

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-06-2017 at 13:43 IST

संबंधित बातम्या