राज्यात करोना विषाणूच्या विरोधात लढाई करताना शासन व प्रशासनासह मंत्री-मंत्री आणि मंत्री व प्रशासनात कोणताही ताळमेळ दिसत नाही. यात राज्याचे नेतृत्व दुबळे पडत आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला.

सोलापुरात आज दुपारी करोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस आले होते. यावेळी प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.  करोनाची लढाई लढताना शासनाकडून होणाऱ्या चुकांवर त्यांनी भाष्य केले.

फडणवीस म्हणाले, करोना हा राजकीय विषय नाही, तर लढाईचा विषय आहे. त्याविरोधात लढताना शासन व प्रशासनात योग्य समन्वय असावा लागतो. मंत्री-मंत्री, अधिकारी यांच्यात समन्वय नसेल तर तो राज्याच्या नेतृत्वाने साधावा लागतो. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता त्याचा पूर्ण अभाव आहे. प्रशासनातील अधिकारी तर स्वतःच शिष्टाचार ठरवू लागले आहेत. ते दूर व्हायला हवे.

राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी त्यावर आळा घालण्यासाठी पुन्हा टाळेबंदी लादण्याची गरज नाही. यापूर्वी टाळेबंदी लागू केली, ती योग्यच होती. अन्यथा करोनाचा प्रादुर्भाव आजच्या पेक्षा चार पटींनी वाढला असता. टाळेबंदी हे धोरण असू शकत नाही. तर जनजीवन पूर्वपदावर आणणे हे धोरण असू शकते. एखाद्या प्रतिबंधित क्षेत्रापुरता टाळेबंदीचा विचार होऊ शकतो. राज्यात केश कर्तनालये तीन महिन्यांपासून बंदच आहेत. त्यामुळे नाभिक समाजाने खायचे काय? याचाही विचार झाला पाहिजे, असेही मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयित रूग्णांचा शोध आणि चाचण्यांचे (ट्रेसिंग आणि टेस्टिंग) प्रमाण वाढविण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी मांडले. सोलापुरात करोनाबळींचे प्रमाण चिंताजनक आहे. मृत्यूदर कमी होण्यासाठी विशेष लक्ष दिले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोकाही फडणवीस यांनी व्यक्त केला. सोलापुरात करोना मृत्युंची संख्या अचानकपणे ४० ने वाढविताना त्यासाठी दिले गेलेले स्पष्टीकरण समाधानकारक वाटत नाही, असा शेराही त्यांनी मारला.
……
पडळकरांना कानपिचक्या –
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेबद्दल नापसंती व्यक्त करत, फडणवीस यांनी पडळकर यांना कानपिचक्या दिल्या. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून ते आमचे राजकीय विरोधक आहेत. ते काही शत्रू नाहीत. ज्येष्ठ नेत्यांबद्दल चुकीच्या पध्दतीने वक्तव्य करणे योग्य नाही. याबाबत तरूण नेत्यांनी नेहमीच संयम बाळगायला हवा, अशी सूचनाही त्यांनी केली.