अलिबाग : लग्नसराईचा हंगाम सध्या जोमात आहे. हंगामातील शेवटचे मुहूर्त साधण्यासाठी यजमानांची धावपळ सुरू आहे. मात्र खोपोली तालुक्यातील बीड जांबरुंग येथे लग्न कार्यातील हळदी समारंभातील वाद विकोपाला गेल्याची घटना समोर आली आहे. यात एकाचा खून झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
खोपोली तालुक्यातील बीड जांबरुंग येथे आदिवासी वाडीवर हळदी समारंभ सुरू होता. रात्रीच्या एक वाजता हळदी समारंभासाठी आलेले गाण्यांच्या ठेक्यावर थिरकत होती. यावेळी तिथे आलेल्या दोघांनी कपडे काढून नाचण्यास सुरुवात केली. यावर तेथील काही यजमानांनी आक्षेप घेतला. कुटूंबातील महिला नाचत असल्याने, कपडे काढून नाचू नका असा सल्ला त्यांनी दोघांना दिला. यामुळे कपडे काढून नाचणाऱ्या दोन्ही आरोपींना राग आला. त्यांतील एकाने विलास वाघमारे फिर्यादी यांच्या कानाखाली मारून, मारहाण सुरू केली. तर दुसऱ्या आरोपीने लोखंडी कालथा (उलटणे) घेऊन फिर्यादीच्या डोक्यात वार केला. ज्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यामुळे फिर्यादी विलास यांचा मोठा भाऊ अनंत वाघमारे हस्तक्षेप करण्यासाठी आला. तेव्हा आरोपी बाळू उर्फ बिट्या मुकणे, आणि प्रकाश पवार यांनी लोखंडी कालथ्याने अनंता यांना जबर मारहाण केली. ज्यात अनंता वाघमारे यांचा मृत्यू झाला.
मारहाणीनंतर जखमी अवस्थेत असलेल्या विलास वाघमारे आणि अनंता वाघमारे यांना खोपोली येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र अनंता वाघमारे यांचा वाटेतच मृत्यू झाला होता. या प्रकरणी खोपोलीस पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विवीध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र पोलिसांनी रातोरात तपासाची सूत्र हलवत बाळु उर्फ बिट्या मुकणे यास केळवली रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. तर प्रकाश पवार फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
घटनेनंतर वरिष्ट पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी घटनास्थळाला भेट दिली. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश पोलीसांना दिले. दरम्यान या घटनेमुळे बीड जांबरुंग आदिवासी वाडीवर शोककळा पसरली आहे.