वाई : महाबळेश्वार येथे एका बंगल्यात करोनाचे सर्व नियम मोडून धनाढ्य कुटुंबाचा लग्नसोहळा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड गावात सागर श्रीकांत तराळ यांचा बंगला आहे. करोनामुळे सध्या कठोर टाळेबंदी आणि निर्बंध असतानाही त्यांनी एका श्रीमंत कुटुंबासाठी हा बंगला विवाहसोहळ्यासाठी भाड्याने दिला. या बंगल्यात संबंधित कुटुंबातील पुण्या-मुंबईहून शेकडो लोक येथे आले. या मेजवानीवेळी त्यांनी रात्री मद्यधुंद अवस्थेत नाचगाणे सुरू केले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी बंगल्याकडे धाव घेतली. या वेळी शेकडो लोक या मेजवानीत मुखपट्टी न लावता मद्यधुंद अवस्थेत नृत्य करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार त्यांनी पोलिसांना कळवताच पांचगणी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अरविंद श्रीरंग माने यांनी घटनास्थळी भेट देत गुन्हा दाखल केला आहे.

मुळात जमावबंदी आणि जिल्हाबंदी असताना शासनाचे आदेश धुडकावत हे एवढे लोक या ठिकाणी आलेच कसे, तसेच त्यांना हा मद्यसाठा कोठून उपलब्ध झाला या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.