सांगली : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावलेल्या प्रमोद चौगुले याचे सांगलीत शनिवारी जोरदार स्वागत करण्यात आले. पुण्याहून सांगलीत त्याचे आगमन होताच त्याचे मित्र मंडळी, नातेवाईक आणि सांगलीतील नागरिकांच्यावतीने त्याच्यावर फुलांची उधळण करण्याबरोबरच फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

प्रमोद हा सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी गावचा रहिवासी. त्याचे वडील टेम्पोचालक आहेत तर आई शिवणकाम करत कुटुंबाला हातभार लावते. अशा सामान्य कुटुंबातून आलेल्या प्रमोदचे प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पुढे पलूसच्या नवोदय विद्यालयात माध्यमिक आणि त्यानंतर कराडचे अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याने उच्च शिक्षण घेतले. त्याच्या कुटुंबाची शैक्षणिक पार्श्वभूमी फारशी नसताना देखील त्याने आजवर त्याच्या यशाच्या आलेखाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तो राज्यात प्रथम आल्याचे समजताच कालच सर्वत्र त्याच्या अभिनंदनाचे संदेश, फलक लागले होते. या यशानंतर आज तो पुण्याहून सांगलीत येणार होता. या वेळी त्याच्या मित्रांनी त्याचे जल्लोषात स्वागत करण्याची योजना तयार केली होती. यानुसार आज त्याचे पुण्याहून सांगलीत आगमन झाल्यानंतर फुलांची उधळण करण्यात आली.

करोना काळात परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याने नैराश्य येत होते. यातच घरी करोनानेही शिरकाव केल्याने त्याचाही परीणाम झाला होता. या स्थितीतही अभ्यास कायम सुरू ठेवला आणि त्याचे फळ मिळाले.

– प्रमोद चौगुले