पंजाबमधील घुमान येथे भरणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संत साहित्यिक व विचारवंत प्रा. सदानंद मोरे बुधवारी निवडून आले. त्यांच्या निवडीचे नांदेड जिल्ह्य़ातील सारस्वतांमधून स्वागत करण्यात आले.
प्रा. मोरे यांच्या निवडीमुळे आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी दिली. मोरे यांची निवड उत्तम आणि योग्य असून संमेलन चांगल्या पद्धतीने पार पडो, ही शुभेच्छा, असे ते म्हणाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत म्हणाले की, संत नामदेवांच्या कर्मभूमीत होणाऱ्या घुमानमधील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मोरे यांची निवड होणे ही आनंदाची बाब आहे. मध्ययुगीन संत वाङ्मयाची उकल करणाऱ्या व तात्त्विक बैठक असणाऱ्या मोरे यांनी तत्त्वज्ञानासारख्या क्षेत्राविषयी उगीचच भयभीत करणारे वातावरण मोकळे केले. अतिशय सुबोधपणे त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचून वातावरण अतिशय मोकळे गेले, हे त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
ज्येष्ठ साहित्यिक व लेखक प्रा. तु. शं. कुळकर्णी म्हणाले की, मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी संत तुकाराममहाराज यांच्या वंशातील प्रा. सदानंद मोरे यांची निवड अभिनंदनीय बाब आहे. डॉ. मोरे केवळ संत साहित्याचे अभ्यासक नाहीत, तर पुरोगामी सामाजिक विचारवंत व मराठी इतिहासाचेही गाढे अभ्यासक आहेत. संत नामदेव महाराजांच्या साहित्याचा त्यांचा अभ्यास विवेचक व अभिनिवेशरहीत आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली घुमान साहित्य संमेलन चिरस्मरणीय होईल, यात शंका नाही. ‘लोकसत्ता’तून प्रसिद्ध होणारे त्यांचे ‘समाजचिंतन’ त्यांच्या वस्तुनिष्ठ विचारसरणीचा व वास्तववादी मूल्यमापनाचा उत्कृष्ट नमुना आहे. अशा विचारवंत व तत्त्वज्ञ व्यक्तिमत्त्वामुळे हे साहित्य संमेलन यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.
स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी मोरे यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले. साहित्यिक देवीदास फुलारी म्हणाले की, संत साहित्य व प्राचीन साहित्याचे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे यांच्या संमेलनाध्यक्षपदी निवडीमुळे मराठी वाङ्मयीन चळवळीच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट घडली आहे. केवळ प्राचीन व अर्वाचीन साहित्याचा अभ्यासक नव्हे, तर त्यावरील त्यांची परखड मतेही साहित्यिकांना नेहमीच लाभदायक ठरली आहेत. त्यांच्या निवडीने मराठी वाङ्मयीन चळवळीला दिशा मिळू शकेल.
प्रा. जगदीश कदम म्हणाले की, कोणत्याही वादाशिवाय ही निवड पार पडल्याने आनंद वाटतो. संत साहित्यात मोरे यांचे योगदान मोठे आहे.