महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये नववर्षांचे स्वागत मोठय़ा जल्लोषात व उत्साही वातावरणात साजरे झाले. राज्यातून व राज्याबाहेरून ठिकठिकाणच्या हौशी पर्यटकांनी या गिरिस्थानात गर्दी केली होती. बहुतेक सर्व मोठमोठय़ा हॉटेलमध्ये विद्युत रोषणाई केली होती, तर नववर्षांच्या स्वागतासाठी विविध करमणूक, संगीताचे कार्यक्रम- खेळांचे आयोजन केले होते .
 नववर्षांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणी परिसरात अनेक जण येतात. यासाठी अनेकजण या भागातील हॉटेल्समध्ये आगावू नोंदणी करतात. यामुळे आज या परिसरात राहण्यासाठी कुठेही जागा शिल्लक नव्हती. जागेच्या शोधात पर्यटक मोठय़ा संख्येने परिसरात हिंडत होते. पर्यटकांच्या गर्दीमुळे आज या परिसरातील हॉटेल मधील खोल्यांचे दर साडेसहा हजारापासून साडेनऊ हजारांपर्यंत पोहोचले होते. यंदा हॉटेल्स बरोबरच खासगी बंगले, रिसॉर्ट्स, फार्महाऊसेस आदी ठिकाणीही पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील पर्यटक मोठय़ा संख्येने आहेत. बहुतेक सर्व हॉटेल्स, दुकानांवर सजावट व विद्युत रोषणाई केल्यामुळे बाजार पेठ उजळून गेली होती. रात्री १२च्या सुमारास आतशबाजी करून एकमेकाला नूतन वर्षांच्या शुभेच्या देऊन जल्लोष साजरा केला. दरम्यान सरत्या वर्षांला निरोप देताना आज सकाळपासूनच ढगाळ हवामान व हवेत सुखद गारवा होता. दिवसभर अगदी क्वचितच सूर्यदर्शन होत होते.