पंढरपूर : हरिनामाचा गजर.. टाळ मृदुंगाचा जयघोष आणि जेसीबीने फुलांची उधळण अशा भक्तीमय आणि मोठ्या उत्सहात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर केले. या वेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालखीचे दर्शन घेवून पालकमंत्री यांनी रथाचे सारथ्य केले. तर पालखी सोहळ्यात पायी चालून वारकऱ्यांसोबत टाळ मृदुंगावर ठेकासुद्धा धरला. माउलींचा पालखी सोहळा नातेपुते येथे मुक्कामी असून शुक्रवारी पुरंदवडे येथे पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेतले. धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री पाटील यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर, माजी आमदार रामहरी रुपनवर, अकलूजचे प्र. उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – मुंबई पुणे जुन्या महामार्गावर एसटी बसचा अपघात, ६ प्रवाशी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

माऊलीच्या पालखी स्वागतपूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माऊलीच्या रथाचे सारथ्य केले. नंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर गेले.

जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर माऊलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी भाविक व ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती. यानंतर पालखी पुढे नातेपुते येथे मुक्कमी पोहोचली. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी १०.४५ वाजता धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र दुद्दी, मुख्य कार्यकारी अधिकारी यासणी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलीच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला. नातेपुते येथून शुक्रवारी माउलीची पालखी पुढे प्रस्थान ठेवून मांडवी ओढा येथे विसावा घेईल. त्यानंतर पुरंदवडे येथे पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होणार आहे.

हेही वाचा – “महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकही मुस्लिम आमदार नाही”, समाजवादी पार्टीचं मविआ नेत्यांना पत्र, एमआयएमचा उल्लेख करत म्हणाले…

संत तुकाराम महाराज पालखी प्रवेश व रिंगण

शुक्रवारी एकीकडे माउलींचे पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होणार आहे, तर दुसरीकडे संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. अकलूज येथे तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welcoming dnyaneshwar maharaj palanquin at the border of solapur district ssb
Show comments