मुंबई : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा फटका कर्करोगग्रस्तांनाही बसत आहे. कर्करोगाच्या रुग्णांची केमोथेरपी झाल्यानंतर होणारी केसगळती रोखण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ‘स्कॅल्प कूलिंग’वर सध्या मर्यादा येत आहे. या उपचार पद्धतीसाठी वापरण्यात येणारे घटक घेऊन येणारी जहाजे सध्या होर्मूझच्या सामुद्रधुनीत अडकली असून त्यासाठी रुग्णांना १५ ते २० दिवस वाट पाहावी लागणार आहे.

कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या किमोथेरपीनंतर रुग्णांची केसगळती होते. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी स्कॅल्प कूलिंग उपचार पद्धतीचा वापर केला जातो. केमोथेरपीपूर्वी आणि नंतरही स्कॅल्प कूलिंग केले जाते. यामध्ये रुग्णांच्या डोक्यात कूलिंग घटक असलेले एक प्रकारचे हेल्मेट घातले जाते. हे घटक परदेशातून आयात करावे लागतात. मात्र युद्धामुळे या घटकांची आयात रखडल्याने बाजारात त्याची उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णालयांनाही या घटकांचा तुटवडा जाणवत आहे.

स्कॅल्प कुलिंग पद्धतीसाठी साधारणत: ५ ते १० हजार रुपये खर्च येत असून आर्थिक परिस्थिती चांगली असणारे रुग्णच त्याचा वापर करतात. ही उपचारपद्धत बंधनकारक नसल्याने एक ते दीड हजारांमधून एक रुग्ण त्याचा वापर करतो. यामुळे रुग्णालयांतही या घटकांचा साठा मोजक्या प्रमाणात असतो, अशी माहिती ऑन्कोतज्ज्ञ डॉ. प्रीतम जैन यांनी दिली. या घटकाचा वापर फारच कमी प्रमाणात असल्याने त्याचा तुटवडा अजून फारसा जाणवत नसल्याचे बॉम्बे रुग्णालयातील कर्करोग विभागप्रमुख डॉ. दिलीप निकम यांनी सांगितले.

स्कॅल्प कुलिंग म्हणजे काय?

– स्कॅल्प कुलिंग पद्धत ही किमोथेरपीपूर्वी आणि नंतरही वापरली जाते. यामध्ये वापरण्यात येणार्‍या घटकामुळे डोक्यातील रक्तवाहिन्या अरुंद होतात.

– त्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचणार्‍या केमोथेरपीचे प्रमाण कमी केले जाते. परिणामी, केमोथेरपीमुळे होणारी केसगळती कमी होते.

– स्कॅल्प कुलिंग पद्धतीमध्ये एक प्रकारचे हेल्मेट रुग्णांच्या डोक्यात घातले जाते. या हेल्मेटमध्ये वापरले जाणारे कुलिंग एजंट हे रक्तवाहिन्या अरुंद करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.