West Bengal Results : “पराभव आहेच, पण प. बंगालमध्ये फसवणूक झाली”, चंद्रकांत पाटलांनी केला आरोप!

पश्चिम बंगालमधील पराभवावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Assembly Election Results 2021 chandrakant patil on mamata banerjee

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात मतदारांनी आपला कौल दिल्याचं आकडेवारीवरून आता स्पष्ट होऊ लागलं आहे. मतदारांनी तृणमूल काँग्रेसला एकहाती सत्ता दिल्याचं स्पष्ट झालं असताना आता महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडून भाजपावर निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम बंगालमधील पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव मान्यच आहे. पण पश्चिम बंगालमध्ये फसवणूक झाली. डावे आणि काँग्रेसने आपली मतं तृणमूलच्या पारड्यात टाकली. त्यामुळे तिथे भाजपा विरुद्ध सर्व अशी लढत झाली”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भाजपाची दिग्गज मंडळी प्रचारात!

पश्चिम बंगालची निवडणूक भाजपा आणि तृणमूल अशा दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपाकडून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री अशा अनेकांच्या सभा प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये झाल्या. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. पायाला दुखापत होऊन देखील व्हीलचेअरवर बसून ममता बॅनर्जी यांनी पूर्ण राज्यात प्रचारसभा घेतल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता निकालांचं परीक्षण केलं जाऊ लागलं आहे.

“साम, दाम, दंड, भेद, सगळं करूनही पंढरपूरात महाविकासआघाडीला जनतेने नाकारलं”

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पुरेसं संख्याबळ मिळालेलं नाही. लोकशाहीत निकाल मान्य करावे लागतात. पण काँग्रेस आणि डाव्यांनी पूर्णपणे तृणमूलच्या पारड्यात आपली मतं टाकली आहेत. त्यामुळे देशात आता हे स्पष्ट झालं आहे की भाजपा विरुद्ध सगळे. त्यामुळे वाट्टेल ते करा पण भाजपाला पराभूत करा हाच फंडा पश्चिम बंगालमध्ये चालला”, असं ते म्हणाले.

“प. बंगालच्या जनतेनं आधुनिक नीरोचे फिडल काढून घेतले”, काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!

…म्हणून भाजपाचे दिग्गज प्रचाराला गेले!

पश्चिम बंगालमध्ये भाजपाची अनेक दिग्गज मंडळी प्रचाराला जाऊन देखील पक्षाला विजय मिळवता आला नाही, अशी टीका आता होऊ लागली आहे. मात्र, हा दावा चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावला आहे. “दु:ख तर वाटणारच. पण आम्ही पक्ष कार्यकर्ते असतो. त्यामुळे आम्ही सगळीकडे जातो. मोदीजी, अमित शाह नेते आहेत म्हणून ते सगळीकडे गेले. आम्ही निवडणुका गंभीर्याने घेतो. पण लोकशाहीत फसवणूक होतेच, ती बंगालमध्ये झाली. भाजपाला पराभूत करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये सगळे एकत्र आले. तरी देखील आम्हाला बऱ्याच जागा मिळाल्या आहेत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: West bengal assembly election results 2021 bjp changrakant patil on mamata victory pmw