मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा अकरावा दिवस आहे. काल मध्यरात्री प्रसाद लाड, उदय सामंत आणि इतर मंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला होता. त्यानंतर मनोज जरांगे यांनी बंद केलेले वैद्यकीय उपचार पुन्हा सुरू केले आहेत. आज याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उपमुख्यमंत्री असतील किंवा मी असेन आमचं स्पष्ट मत आहे की आजपर्यंत मराठा समाजाला जे काही दिलं आहे ते आम्हीच दिलं आहे. जे काही निर्णय घेतले आहेत ते आम्हीच घेतले आहेत. यापुढेही जे निर्णय घ्यायचे असले तर आम्हीच घेणार आहोत. काही अडचणी आहेत त्या दूर करुन आपण सगळे निर्णय घेतले आहेत. केवळ कागदावरचे निर्णय नाही तर प्रत्यक्ष फायदा मराठा समाजाला झाल्याचं पाहण्यास मिळालं आहे. जे संविधानात असेल, कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन असेल ते नक्की मिळेल. कुणाच्याही ताटातलं काढून कुणाच्या ताटात टाकणारे आम्ही नाही. मराठा समाज असो किंवा इतर सगळ्या समाजांना न्याय दिला आहे. मराठा समाजाला न्याय आम्हीच देणार आहोत. जे काही शक्य आहे ते आम्ही नक्की करु. चर्चेची दारं आम्ही बंद केलेली नाहीत, सरकार चर्चा करुन मार्ग काढत असतं. त्याच दृष्टीने कारवाई चाललेली आहे.

मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण झाल्या का?

मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत का? असं विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले, जे जे मुद्दे आले त्या सगळ्याची सोडवणूक आले. आता त्यांना त्यातही काही गॅप्स वाटत असतील किंवा त्यांच्या मनात शंका असेल तर त्या त्यांनी विचाराव्यात त्या दूर केल्या जातील असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

मनोज जरांगे यांनी आज काय आरोप केले?

राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठ्यांचं सर्वात मोठं वाटोळं केलं आहे. त्यांच्या एवढं कुणीच वाटोळं केलं नाही. त्यांनी गोड गोड बोलून आमचं वर्ष वाया घालवलं. मराठ्यांचं नुकसान केलं. विखेंनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण केलं, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर हल्ला चढवला. विखे पाटलांनी आता तरी खरं बोलावं, असं आव्हानही त्यांनी दिलं. जरांगे पाटील मीडियाशी संवाद साधत होते. विखेंनी खरं बोलावं. त्यांच्यामुळेच आमचं वाटोळं झालं आहे. समाजाचं नुकसान झालं आहे. सातारा संस्थानचं गॅझेटेरियर एक महिन्यात देतो असं विखे म्हणाले होते. एक वर्ष झालं. आताही बरीच आश्वासने दिली. कोणत्या हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र दिलं? काहीच दिलं नाही. केवळ आश्वासन दिलं. विखेंनी वाटोळं केलं. मराठा संपायला आला. कामं झाले नाही, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे