Ashadhi Wari 2025 : ‘विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम’, ‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम’… हरिनामाचा जयघोष करत दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर वारीमध्ये सहभागी होतात. वारी ही महाराष्ट्रातील सर्वांत पूजनीय आणि शतकानुशतके जुनी तीर्थयात्रा आहे. दरवर्षी देहू येथून तुकोबांची आणि आळंदीहून ज्ञानोबांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते.
आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव असून, या काळात सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. यावेळी संताच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होते. यंदा जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानाकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार तुकोबांची पालखी १८ जून २०२५ रोजी देहू येथून प्रस्थान झाले. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आळंदी येथून जेष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच १९ जून २०२५ रोजी ज्ञानोबांच्या पालखीचे प्रस्थान झाले. रविवारी (६ जुलै) आषाढी एकादशीला पंढरपूर शहरात ही वारी समाप्त होईल. दोन्ही पालख्यांचे मार्ग आणि नियोजन कसे असते याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी २०२५ वेळापत्रक (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025 Schedule)
आळंदीत मिरवणूक सुरू होते, जिथे संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली आणि मोठ्या वारी चळवळीत सामील होण्यासाठी राज्यभर फिरतात.
प्रस्थान : १९ जून २०२५ (गुरुवार)
पंढरपूरमध्ये आगमन : ५ जुलै २०२५ (शनिवार)
आषाढी एकादशी : ६ जुलै २०२५ (रविवार)
दिवसानुरूप मार्ग
१९ जून : आळंदी येथून प्रस्थान
२० जून : पुणे (भवानी पेठ)
२१ जून : पुणे
२२ जून : सासवड
२३ जून : सासवड
२४ जून : जेजुरी
२५ जून : वाल्हे
२६ जून : लोणंद
२७ जून : तरडगाव
२८ जून : फलटण
२९ जून : बरड
३० जून : नातेपुते
१ जुलै : माळशिरस
२ जुलै: वेळापूर
३ जुलै : भंडीशेगाव
४ जुलै : वाखरी
५ जुलै : पंढरपुरात आगमन
६ जुलै : पंढरपूर
७ जुलै : पंढरपूर
८ जुलै : पंढरपूर
९ जुलै : पंढरपूर
१० जुलै : वाखरी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025 Route)
दरवर्षी श्री क्षेत्र आळंदी येथून ज्ञानोबा माऊलीच्या पालखीचे प्रस्थान होते. त्यानंतर पालखीचे पुणे शहरात आगमन होते. भवानी पेठ येथे पालखीचा पहिला मुक्काम असतो. त्यानंतर पुढच्या दिवशी पालखी पुण्याहून सासवडच्या दिशेने पुढे जाते. सासवडमध्ये पालखीचा दुसरा मुक्काम असतो. पालखी दोन दिवस सासवडमध्ये मुक्कामी थांबते. त्यानतंर जेजुरी आणि वाल्हे येथे एक दिवस मुक्काम करून पालखी निरा गावी पोहोचते. नीरा नदीमध्ये श्रींचे स्नान होते आणि त्यानंतर पुढच्या दिवशी पालखी लोणंदमध्ये मुक्कामी थांबते. त्यानंतर ती पुढच्या दिवशी चांदोबाचा लिंब येथे पोहोचते, जिथे पहिले उभे रिंगण सोहळा पार पडतो. त्यानंतर तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते या ठिकाणी एकेक दिवस मुक्काम करत पालखी पुरंदवडेला पोहोचते, जिथे पहिला गोल रिंगण सोहळा पार पडतो आणि पालखी माळशिरस येथे मुक्कामी थांबते. पुढील दिवशी खडूस फाटा येथे पालखी पोहोचते, जिथे दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडतो. त्यानंतर वेळापूरला एक दिवस मुक्काम करून, पालखी ठाकुरबुवाची समाधी येथे पोहोचते, जिथे तिसरा गोल रिंगण सोहळा पार पडतो. त्यानंतर ज्ञानोबा माऊली अन् संत सोपानदेव यांची भेट होते. त्यानंतर वाडीकुरलीमार्गे भंडीशेगावला पालखी मुक्कामी पोहोचते. त्याच्या पुढच्या दिवशी बाजीरावची विहीर येथे पोहोचते, जिथे दुसरा उभे रिंगण सोहळा आणि चौथा गोल रिंगण सोहळा पार पडतो. त्यानंतर वाखरी येथे एक दिवस मुक्काम करून पालखी पंढपूरला पोहचते. तिथे पादुकांजवळ आरती आणि तिसरा उभे रिंगण सोहळा पार पडतो. पालखी पंढरपूर येथे मुक्कामी थांबते. दुसऱ्या दिवशी पालखीची नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर श्रींचे चंद्रभागेत स्नान होते. त्यानंतर तीन दिवस पालखी पंढरपुरात मुक्कामी थांबते. त्यानंतर पुढच्या दिवशी श्रींचे चंद्रभागेत स्नान होते आणि गोपाळकाला व श्री विठ्ठल-रुक्मिणीची भेट घेतली जाते. त्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू होतो.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (परतीचा प्रवास) (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg (Return journey)
विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन, पंढरपूरमधून ज्ञानोबांची पालखी परतीचा प्रवास सुरू करते आणि वाखरी येथे मुक्कामी थांबते. त्यानंतर वेळापूर, नातेपुते, फलटण, पाडेगाव या ठिकाणी मुक्कामी थांबते. पाडेगावमध्ये क्षी नीरा स्थान (श्रींचे नीरा स्नान ) होते आणि वाल्हे येथे पालखी मुक्कामी थांबते. त्यानंतर सासवड, हडपसर, भवानी पेठ असा पालखीचा मुक्काम होतो. पुण्यात पालखी दोन दिवस मुक्काम करते आणि त्यानंतर आळंदीला पोहोचते. आळंदीला मुक्काम करून, आळंदीला नगरप्रदक्षिणा घालून श्री माऊली मंदिरात पालखी पोहोचते आणि पालखी सोहळ्याची सांगता होते.
संत तुकाराम महाराज पालखी २०२५ वेळापत्रक (Sant Tukaram Maharaj Palkhi 2025 Schedule)
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे त्यांचे जन्मस्थान देहू येथून मिरवणूक सुरू होते आणि पुढे ती पंढरपूरकडे निघते. हजारो भाविक त्यांच्या पादुका आणि पालखीबरोबर चालत असतात.
प्रस्थान : १८ जून २०२५ (बुधवार)
पंढरपूरमध्ये आगमन: ५ जुलै २०२५ (शनिवार)
आषाढी एकादशी : ६ जुलै २०२५ (रविवार)
दिवसानुरूप मार्ग
१८ जून : देहू – प्रस्थान समारंभ
१९ जून : आकुर्डी
२० जून : पुणे (नाना पेठ)
२१ जून : पुणे (नाना पेठ)
२२ जून : लोणी काळभोर
२३ जून : यवत
२४ जून : वरवंड
२५ जून : उंडवडी गवळ्याची
२६ जून : बारामती (शारदा विद्यालय)
२७ जून : सणसर
२८ जून : निमगाव केतकी पालखी तळ
२९ जून : इंदापूर
३० जून : सराटी
१ जुलै : अकुलज माने विद्यालय
२ जुलै : बोरगांव श्रीपुर
३ जुलै : पिराची कुरोली गायरान
४ जुलै : वाखरी
५ जुलै : श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज मंदिर (नवीन इमारत)
६ जुलै : श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज मंदिर (नवीन इमारत)
तुकाराम महाराज पालखी मार्ग (Tukaram Maharaj Palkhi Marg)
श्री क्षेत्र देहू येथून श्री संत तुकाराम महाराजाच्या पालखीचे प्रस्थान होते. त्यानंतर आकुर्डी येथे एक दिवस मुक्काम करून, पालखी पुण्यात नाना पेठ येथे पोहोचते. नाना पेठेमध्ये पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो. त्यानंतर लोणी काळभोर, यवत, वरवंड, उंडबडी गवळ्याची, बारामती या ठिकाणी मुक्काम करत पालखी सणसर येथे मुक्कामी पोहोचते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बेलवाडी येथे पहिला गोल रिंगण सोहळा पार पडतो आणि निमगाव केतकी येथे पालखी मुक्कामी थांबते. त्यानंतर इंदापूर येथे दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडतो आणि तेथेच पालखी मुक्कामी थांबते. त्यानंतर सराटी येथे एक दिवस मुक्काम करते, जिथे नीरा नदीत स्नान करत पालखी अकलूज माने विद्यालय येथे पोहोचते, जिथे तिसरा गोल रिंगण सोहळा पार पडतो आणि तेथेच पालखी मुक्कामी थांबते. त्यानंतर माळीनगर येथे पालखी पोहोचते, जिथे पहिला उभे रिंगण सोहळा पार पडतो. त्यानंर बोरगाव श्रीपूर, पिराची कुरोली गायरान येथे एकेक दिवस मुक्काम करत पालखी बाजीराव विहीर येथे पोहोचते, जिथे दुसरा उभा रिंगण सोहळा पार पडतो. त्यानंतर वाखरी येथे पालखी मुक्कामी थांबते. त्यानंतर क्षी क्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचते, जिथे पादुकांची आरती होते आणि तिथेच तिसरा उभा रिंगण सोहळा पार पडतो. पंढरपूरमध्ये श्री क्षेत्र संत तुकारामा महाराज इमारत मंदिर येथे पालखी मुक्कामी थांबते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा पूर्ण करते. चार दिवस पंढरपूरमध्ये मुक्काम करून पालखी पुन्हा देहूच्या दिशेने निघते.
तुकाराम महाराज पालखी मार्ग परतीचा प्रवास (Tukaram Maharaj Palkhi route return journey)
विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन पंढरपूरमधून तुकोबांची पालखी देहूच्या दिशेने प्रस्थान करते. त्यानंतर वाखरी, म्हाळुंगे, वडापुरी, लासूर्णे, वऱ्हाणपूर, हिंगणीगाडा, वरवंड, कुंजीरवाडी येथे एक दिवसाचा मुक्काम करत पालखी पुण्यात नवी पेठ येथे पोहचते. येथे पूर्ण दिवस मुक्काम करून, पालखी श्री क्षेत्र देहू येथे पोहोचते आणि तेथे वारीची सांगता होते.