मुंबई : ‘पवित्र पोर्टल’मार्फत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये चार मोठे बदल करण्यात आले आहेत. चाचणी परीक्षेतील गुण एकवेळच्या निवडीसाठी लागू राहतील, उमेदवारास ५० प्राधान्यक्रम देता येतील, अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना होईल आणि सेमी इंग्रजीसाठी इंग्रजी किंवा विज्ञान पदवीधर सुद्धा पात्र असतील, या बाबी शिक्षक भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
बदल १ ला :
उमेदवाराच्या चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह एक वेळ निवडीच्या शिफारशी साठी लागू राहतील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हावयाचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. पूर्वीच्या तरतुदीनुसार नव्याने येणाऱ्या जाहीरातीनुसार शिफारस झालेला उमेदवार शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहत होता.
बदल २ रा :
उमेदवारास त्याच्या सोईनुसार जास्तीत जास्त एकुण ५० प्राधान्यक्रम आता लॉक करता येणार आहेत. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल. जुन्या तरतुदीनुसार उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येत होते.
बदल ३ रा :
पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे. त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची यापुढे परिगणना करण्यात येईल. जुन्या तरतुदीनुसार व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले वय विचारात घेतले जात होते.
बदल ४ था :
१ ली ते ५ वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरिता सामाजिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन ज्या उमेदवारांनी व्यवसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र १२ विज्ञान किंवा इंग्रजी पदवी-पदव्युत्तर किंवा विज्ञान पदवी-पदव्युत्तर अर्हता धारण केली आहे, अशांना पात्र समजण्यात येणार आहे. जुन्या तरतुदीनुसार सेमी इंग्रजी शाळांसाठी मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविकाधारक असणे आवश्यक होते.
बदल कशासाठी ?
राज्यातील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया राबविली जाते. सदर काम राज्य परीक्षा परिषदेकडे आहे. पवित्र पार्टलच्या प्रक्रियेसंदर्भात ऑक्टोबर २०२३ मध्ये तरतूदी जाहीर केल्या होत्या. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने मंगळवारी चार सुधारणांचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामध्ये बदल करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. जुन्या काही तरतुदींमुळे शिक्षक पदभरतीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली होती. त्यामुळे त्यात काही बदल करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. नवी प्रक्रिया सुलभ व पारदर्शी आहे, असे शालेय शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
