महाराष्ट्राच्या राजकारणात रोज विविध घडामोडी घडत आहेत. दरम्यान आज संजय शिरसाट यांनी शरद पवार २०२२ मध्येच एनडीएत येण्याच्या प्रयत्नांत होते असं विधान केलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबतही भाष्य केलं आहे. आपण जाणून घेऊ दिवसभरातली पाच महत्त्वाची वक्तव्य काय आहेत?

Live Updates
17:06 (IST) 6 Feb 2026

Mumbai-Pune Expressway: प्रचंड नुकसान… औद्योगिक कंपन्यांपासून शेतमालाला फटका… आपत्कालीन यंत्रणा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर अपघातामुळे झालेल्या ३२ तासांच्या कोंडीचा मोठा फटका उद्योग आणि शेती क्षेत्राला बसला आहे. अब्जावधींचे नुकसान झाल्याने तातडीने आपत्कालीन यंत्रणा आणि पर्यायी पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. ...अधिक वाचा
15:28 (IST) 6 Feb 2026

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत काय म्हणाले मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस?

सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी हा अतिशय घाईत झाल्याची टीका करण्यात हो आहे. शपथविधीची एवढी घाई का? याबाबत सवाल विचारले जात आहेत. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे. ‘सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत जो काही वाद होतोय, तो अतिशय निरर्थक आहे’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सविस्तर वृत्त

15:26 (IST) 6 Feb 2026

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचे विनायक कोंड्याल बिनविरोध

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रियदर्शन साठे आणि एमआयएमकडून तौफिक हात्तुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, शिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महापौर पदाची निवड बिनविरोध झाली आहे.

15:22 (IST) 6 Feb 2026

शरद पवार २०२२ लाच एनडीएत येणार होते, संजय शिरसाट यांचा दावा

अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं, २९ जानेवारीला त्यांना अखेरचा निरोप महाराष्ट्राने दिला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी कांँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी शरद पवार २०२२ मध्येच एनडीए बरोबर येणार होते असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चा नाकारल्या आहेत. अजित पवारांची इच्छा महापालिकांमध्ये एकत्र येण्याची होती, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता मंत्री संजय शिरसाट यांनी २०२२ मध्ये शरद पवार एनडीएसह येणार होते असं म्हटलं आहे.

इथे वाचा सविस्तर वृत्त

15:20 (IST) 6 Feb 2026

अजित पवारांचा अखेरचा व्हिडीओ राष्ट्रवादीला साथ द्या म्हणणारा

७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदांसाठी मतदान होत असून त्यासंदर्भात मतदारांना आवाहन केलेला अजित पवार यांचा विमान अपघातापूर्वी बनवलेला व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी प्रसिद्ध केला. यामध्ये अजित पवार यांनी विकासाच्या प्रवासात राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहन केलेले आहे.

इथे वाचा सविस्तर वृत्त

15:19 (IST) 6 Feb 2026
शरद पवार राज्यसभेवर जाणार का? संजय राऊत काय म्हणाले?

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यातच पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे, तर दुसरीकडे पार्थ पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

सविस्तर वृत्त