स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांची माफी मागण्यास मागच्या वर्षीही नकार दिला होता, आताही नकार दिला आहे. कुणाल कामरा हा त्याच्या बेधडक आणि बिनधास्त कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत कुणाल कामराने अनेकदा अनेक नेत्यांची खिल्ली उडवली होती. दरम्यान मागील वर्षी मार्च महिन्यांत म्हणजेच साधारण १३ महिन्यांपूर्वी कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आणि त्यावरुन वाद निर्माण झाला. कुणाल कामराविरोधात हक्कभंग आणण्यात आला. तसंच कुणाल कामरा विरोधात एकनाथ शिंदेंची शिवसेना न्यायालयात गेली. कुणाल कामराने मात्र माफी मागणार नाही राजकीय व्यंग करण्याचा प्रत्येला अधिकार आहे असं म्हटलं आहे. १३ महिन्यांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? माफी न मागण्यावर कुणाल कामरा अजूनही ठाम का आहे? आपण जाणून घेऊ.

कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केली होती बोचरी टीका

मागच्या वर्षी मार्च महिन्यात कुणालने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘नया भारत’ असं त्या व्हिडीओचं नाव होतं. या व्हिडीओत त्याने ‘भोली सी सुरत’ या गाण्याच्या चालीवर थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी असं म्हणत एक विडंबनात्मक गाणं सादर केलं. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं नव्हतं. पण गाणं ऐकल्यावर ते त्यांच्यावरच आहे हे ऐकणाऱ्यांना कळलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आणि हे गाणं व्हायरल झालं आणि वाद निर्माण झाला.

comedian Kunal Kamra On Eknath Shinde
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत सादर केल्याप्रकरणी माफी मागण्यास कुणाल कामराचा नकार, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

“महाराष्ट्र इलेक्शन में इन्होने जो किया है बोलना पडेगा. यहांपे पहले इन्होने क्या किया? शिवसेना बीजेपीसे बाहर आ गयी. उसके बाद शिवसेना शिवसेनासे बाहर आ गयी, एनसीपी एनसीपी बाहर आ गयी. एक व्होटर को नौ बटन दे दिये. सब कन्फ्युज हो गये. चालू एक जन ने किया था. वो मुंबईमें एक बहोत बढिया डिस्ट्रिक्ट है थाने. वहाँ से आते है..” यानंतर कुणाल कामराने गाणं सुरु केलं आणि ‘मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आये’. ही ओळ गायली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मार्च २०२५ मध्ये व्हायरल झाला होता.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष कुणाल कामराच्या विरोधात आक्रमक

कॉमेडियन कुणाल कामराने संपूर्ण व्हिडीओमध्ये किंवा गाण्यात एकनाथ शिंदे यांचं नाव कुठेच घेतलेलं नाही. मात्र जे गाणं म्हटलं आहे आणि त्यात जे वर्णन केलं आहे त्यावरुन कुणाल कामरा एकनाथ शिंदेंबाबतच बोलला ते स्पष्ट झालं आणि वाद पेटला. एकनाथ शिंदेंनी २०२२ मध्ये बंड करत थेट चाळीस आमदारांना घेऊन शिवसेना सोडली होती. त्यानंतर ते भाजपासह गेले. भाजपाशी हातमिळवणी करुन ते मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं होतं. दरम्यान मागील वर्षी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी जाऊन शिवसैनिकांनी तोडफोड केली होती.

माफी न मागण्यावर कुणाल कामरा मागील १३ महिन्यांपासून ठाम

मी काहीही झालं तरीही एकनाथ शिंदेंची माफी मागणार नाही असं कुणाल कामराने १३ महिन्यांपूर्वीही म्हटलं होतं. आताही त्याचं तेच म्हणणं आहे. कुणालने १२ एप्रिलला एका पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. त्यात कुणाल म्हणतो, मी ज्या हॉटेलमध्ये शो केला तो फेब्रुवारी महिन्यात शूट झाला होता. २२ मार्चला वगैरे मी व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट केला. मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला वाटलं की मी तेव्हा तिथेच होतो. त्यामुळे ते त्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी तोडफोड केली. माझा नंबर शोधला, मला त्या रात्री असंख्य कॉल्स आले होते. मला सांगत होते की तू उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केला आहेस तुला माफी मागावी लागेल. मी म्हटलं घटनेने मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यायोगे जे योग्य असेल ते मी करेन. तुम्हाला आक्षेप असेल तर तुम्ही माझ्या विरोधात पोलिसांत जा. मी कोर्टापुढेही जायला तयार आहे. तुम्ही जनता न्यायालय भरवून मला माफी मागण्यासाठी दबाव आणू शकत नाही. शिवाय मी कुणाबद्दल बोललो ते मी लपवलं नाही. तोडफोड केल्यानंतरही मला माफी माग म्हणून फोन आले. माझा नंबर लीक झाला होता, मी नंबर बदल नाही. कारण माझ्या सगळ्या मित्रांकडे आई वडिलांकडे तोच फोन नंबर आहे. मी धमक्या देणाऱ्यांना सांगितलं की मी माफी मागणार नाही. तेव्हाही तेच म्हणणं होतं. आताही मी त्यावर ठाम आहे मी माफी मागणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणजे काही जनता न्यायालय नाही असंही कुणाल कामराने म्हटलं आहे.

कुणाल कामराची ११ एप्रिलची पोस्ट काय होती?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या विचारधारेचा दावा करतात, तो मूळ विचारांवर आणि टीकेवर आधारित आहे. मग आजच्या काळात कलाकारांना का गप्प केले जात आहे? असेही कुणाल कामराने म्हटले. यावेळी त्यांना देशद्रोही या शब्दाबद्दल विचारणा करण्यात आली होती. यावरही त्याने खुलासा केला. देशद्रोही हा शब्द मी माझे वैयक्तिक मत म्हणून वापरला होता. हा शब्द अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी, अगदी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनीही सार्वजनिक रॅलीमध्ये वापरला आहे. मग फक्त मलाच टार्गेट का केले जात आहे? असा सवाल कुणाल कामराने केला. विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी त्यांना माफी मागण्यास सांगितले. मात्र कुणाल कामराने स्पष्ट नकार दिला. मी माफी मागितली तर ते ऐक ढोंग ठरेल. जर मी माफी मागितली, तर भविष्यात कोणताही कलाकार सरकारवर टीका करायला घाबरेल. हे लोकशाहीसाठी घातक आहे. यामुळे कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल आणि एक चुकीचा पायंडा पडेल, असे कुणाल कामराने म्हटलंय.

बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्राचा दाखला

कुणाल कामराने जी पोस्ट लिहिली आहे त्यात त्याने बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींविषयी काढलेल्या एका व्यंगचित्राचा दाखला दिला आहे. हे आयकॉनिक आहे असंही त्याने म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे एक महान व्यंगचित्रकार होते. त्यांनी हेच नाही अनेक राजकीय व्यंगचित्रं काढली आहेत. पण त्यांच्यावर कधीही अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही, असं म्हणत कुणाल कामराने प्रताप सरनाईकांच्या टीकेला उत्तर दिलं.

What Kunal Kamra Said in his Post?
कुणाल कामराची पोस्ट नेमकी काय? (फोटो-लोकसत्ता ऑनाइन)

कुणाल कामरा प्रकरणात काय काय घडलं?

१) मागील वर्षी मार्च महिन्यात कुणाल कामराने नया भारत हा शो आणला त्यात त्याने एक गाणं सादर केलं होतं. जे एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारं होतं.

२) यानंतर आक्रमक झालेल्या शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराने ज्या ठिकाणी कार्यक्रम केला त्या हॉटेलची तोडफोड केली.

३) कुणाल कामराला धमकीवजा इशारे देण्यात आले, एकनाथ शिंदेंची माफी माग सांगण्यात आलं. पण कुणाल कामरा माफी मागणार नाही यावर ठाम राहिला.

४) कोर्टातही कुणाल कामराने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला, आता पुन्हा एकदा कुणालने काहीही झालं तरीही माफी मागणार नाही म्हटलं आहे.