पॅसिफिक महासागरात वेगाने बदलणाऱ्या हवामानाच्या परिस्थितीमुळे यावर्षी एल निनोचा प्रभाव हा तीव्र विकसित होईल आणि यंदा सुपर एल निनोचं संकट असेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसंच सुपर एल निनोचा परिणाम हा जगातील पावसावर, तापमानावर आणि नैसर्गिक आपत्तींवर होऊ शकतो असंही सांगितलं जातं आहे. एल निनो काय आहे आणि सुपर एल निनो म्हणजे काय? हे आपण समजून घेऊ.

‘एल निनो’ म्हणजे नेमकं काय?

‘एल निनो’ ही पॅसिफिक महासागराशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. मध्य आणि पूर्व पॅसिफिकमधील समुद्राच्या पाण्याचे तापमान जेव्हा सामान्यपेक्षा जास्त वाढते, तेव्हा वातावरणातील वाऱ्यांचे प्रवाह, ढगांची निर्मिती आणि पावसाचे चक्र बदलते. हा बदल दिसायला लहान असला तरी त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या हवामान प्रणालीवर होतो. काही ठिकाणी दुष्काळ, तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होते.

What is Super EL Nino?
सुपर एल निनो म्हणजे काय? (फोटो-AI)

इतिहासातील मोठे एल निनो कुठले होते?

१९९७-९८ एल निनो, जगभरात भीषण पूर आणि दुष्काळ; अब्जावधी डॉलरचे नुकसान.

२०१५-१६ एल निनो, जागतिक तापमान विक्रमी पातळीवर; अनेक देशांत उष्णतेच्या लाटा.

या घटनांदरम्यान भारतात मान्सून खूपच कमी प्रमाणात सक्रिय होता आणि शेती क्षेत्रावर परिणाम झाला होता. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती त्याच पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१५० वर्षांपूर्वी आलेल्या एल निनोमुळे काय घडलं होतं?

साधारणपणे १५० वर्षांपूर्वी, म्हणजे १८७७-७८ मध्ये, पृथ्वीने आजवर नोंदवलेल्या सर्वात टोकाच्या हवामान घटनांपैकी एक अनुभवली. या एल निनोने प्रदीर्घ दुष्काळ, अखंड उष्णतेच्या लाटा आणि पिकांचा विनाश उद्भवला. यातून हवामान संकटं निर्माण झाली, ती अनेक शास्त्रज्ञांच्या मते इतिहासातील सर्वात वाईट होती. जगभरात ३ ते ४ कोटी लोक मरण पावले, जे त्या वेळच्या जागतिक लोकसंख्येच्या ३-४ टक्के होते. हा आजवरचा सर्वात तीव्र म्हणावा असा एल निनो होता. समुद्र पृष्ठभागाचे तापमान तब्बल १६ महिने उच्च राहिले. आपल्या स्मरणात असलेल्या १९९७-९८ आणि २०१५-१६ च्या प्रचंड एल निनोपेक्षाही ते मोठे होते.

What is Super El Nino?
सुपर एल निनो म्हणजे नेमकं काय? (फोटो-AI)

सुपर एल निनो म्हणजे नेमकं काय?

‘सुपर एल निनो’ म्हणजे अशी स्थिती जेव्हा हवामान बदल अत्यंत तीव्र स्वरूपाचा असतो. कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटीचे सहाय्यक राज्य हवामानशास्त्रज्ञ मॅथ्यू सिटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार , जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा किमान २ अंश सेल्सिअसने वाढते, तेव्हा त्याला ‘सुपर एल निनो’ असे म्हटले जातं. ही एक दुर्मिळ घटना असून १९५० पासून आतापर्यंत केवळ चार वेळा अशी स्थिती ओढवली आहे. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, समुद्राचे तापमान २.५ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याची नोंद आतापर्यंत फक्त एकदाच झाली आहे. NOAA च्या अंदाजानुसार, यावर्षीची ही स्थिती “शक्तिशाली” किंवा “अत्यंत शक्तिशाली” स्वरूपात विकसित होण्याची ५० टक्के शक्यता आहे. यापूर्वी २०१५ मध्ये ‘सुपर एल निनो’ची नोंद झाली होती. त्याचा प्रभाव २०१६ मध्ये संपला.

सुपर एल निनोचे भारतावर २०२६-२७ मध्ये काय परिणाम होऊ शकतात?

भारतीय हवामान विभागाने (IMD) १३ एप्रिल रोजी जाहीर केले की नैऋत्य मान्सून २०२६ मध्ये सामान्यापेक्षा कमी, दीर्घकालीन सरासरीच्या ९२%, असेल. २०२३ नंतर प्रथमच भारताला सामान्यापेक्षा कमी एकूण मान्सून पाऊस मिळणार असल्याचे दर्शवते. सामान्य म्हणजे सरासरी जी दर वर्षी कमी होत चालली आहे. ईशान्य, वायव्य आणि दक्षिणी द्वीपकल्प क्षेत्रातील काही भागांचा अपवाद वगळता भारताच्या बहुतेक भागांना सामान्यापेक्षा कमी पाऊस मिळण्याची शक्यता आहे. देशातील जवळपास ६०% शेतकरी पूर्णपणे मान्सून पावसावर खरीप पिकांसाठी अवलंबून आहेत.

भारताती तीव्र आणि दीर्घ उष्णतेच्या लाटा येणार?

भारतासाठी धोके विशेषतः महत्त्वाचे आहेत. उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात तीव्र आणि दीर्घ उष्णतेच्या लाटा येण्याची आणि मान्सून हंगामात सामान्यापेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. या संयोगाने पाण्याच्या साठ्यांवर परिणाम होणार आहे. पाणी पुरवठ्यावर ताण येणार आहे. पीक उत्पादन घटू शकते आणि अन्नधान्याचे भाव वाढू शकतात.