अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला नेमका फरक काय? ते समजावून सांगितलं आहे. तसंच महिला लैंगिक शोषणासारख्या प्रकारांना कशा बळी पडतात याचीही उदाहरणं दिली आहेत. अशोक खरात प्रकरणावरही भाष्य केलं आहे.

शेपूटवाला बाबाचा किस्सा नेमका काय?

पुण्यातल्या परिसरात एक बाबा होता, तो स्वतःला हनुमानाचा अवतार आहे असं सांगत असे. लोक त्याला शेपूटवाला बाबा म्हणत होते. हनुमानासारखं त्याला शेपूट आहे असं तो सांगत असे. त्याची ख्यातीही सर्वदूर पसरली होती. आम्ही त्याला एक्सपोज करण्यासाठी गेलो. त्यावेळी नीलम गोऱ्हे आमच्याबरोबर होत्या. जयदेव डोळे यांनी मला ही आठवण सांगितली होती. तसंच मला जयदेव डोळे असंही म्हणाले होते की ज्या बाबाचा भांडाफोड करण्यासाठी आपण गेलो होतो, नीलम गोऱ्हे होत्या, त्याच नीलम गोऱ्हे या अशोक खरातसह कशा काय दिसल्या? असं मला जयदेव डोळे म्हणाल्याची आठवण श्याम मानव यांनी सांगितली. तो शेपूटवाला बाबा अगदीच चिल्लर होता. त्याचं पितळ उघडं पाडण्यासाठी आम्हाला काही फार वेळ लागला नाही. पत्रकारितेच्या नोकरीत टिकू शकत नाही हे मला साधारण १९८२ च्या दरम्यानच समजलं होतं. त्यामुळे मी चळवळ चालवण्याचा निर्णय घेतला. मी त्याआधी चळवळींमध्ये होतोच असंही श्याम मानव यांनी म्हटलं आहे.

Black Magic
काळी जादू, करणी , भोंदू बाबा या प्रकरणांवरही श्याम मानव यांनी भाष्य केलं आहे. (फोटो-AI)

बी. प्रेमानंद यांच्यासह कसे जोडले गेले श्याम मानव?

एक काळ असा होता की मी प्रचंड अंधश्रद्ध होतो. या जगात चमत्कार नसतात असं सांगणारं कुणी भेटलं नाही. या जगात भूत नाही यावर एक विभाग आहे तो काम करतो आहे हे मला कुणी सांगितलं नाही. त्यामुळे मी लोकांच्या अंधश्रद्धा संपवण्याच्या चळवळीत सहभागी झालो. मला तेव्हा माझ्या अनेक मित्रांनी विरोध दर्शवला होता. तू भिंतीवर डोकं आपटून घेतो आहेस असं मला तेव्हा मित्रांनी सांगितलं होतं. मी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीचा भाग होतो. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ चालवण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे हे मला माहीत होतं. ही चळवळ सुरु करण्याआधी मी गाडगेबाबांचं चरित्र वाचलं. मला अनेक गोष्टी त्यामुळे कळल्या. बी. प्रेमानंद यांचा दौरा महाराष्ट्रात सुरु असताना मी भाषण द्यायचो, ते इंग्रजीत बोलायचे, चमत्कार करायचे. दोन ठिकाणी मार खाण्यापासून मला त्यांना वाचवावं लागलं होतं. मी त्यांच्यासह होतो त्यामुळे मी बी प्रेमानंद यांना मारहाण होण्यापासून वाचवून शकलो. मग मला लक्षात आलं की सभांची पद्धत बदलावी लागेल. बाबा, मांत्रिक कसे चमत्कार करतात याचं प्रात्यक्षिक प्रेमानंद दाखवायचे. हातचलाखी कशी होते हे दाखवायचे. मग गुजरात दौरा करण्याबाबत त्यांनी मला विचारलं. तिथे मी त्यांना अट घातली की तुम्ही फक्त चमत्कार बाबा लोक कसे करतात ते दाखवा. मी हिंदीतून बोलेन आणि लोकांना समजावून सांगेल. तो प्रयोग यशस्वी झाला अशीही आठवण श्याम नाव यांनी सांगितली. मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या घटनांचा उल्लेख केला. लोकांच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठीच मी चळवळ सुरु केली. सगळ्या अंधश्रद्धांचं मूळ हे देव आणि धर्म आहे असं सांगितलं जातं पण हे खोटं आहे. पण एखादी कल्पना माणूस शोधबुद्धीने स्वीकारतो. सूर्याला सुरुवातीला देव माणसाने मानलं. पण जेव्हा कालांतराने जेव्हा त्याच्या हे लक्षात आलं की आपण पूजा केली नाही तरीही सूर्य वेळेवरच उगवतो आणि वेळेवरच मावळतो, तेव्हा त्याने सूर्याला सोडून दिलं. त्यानंतर अग्निला देव मानू लागला, पण अग्निवर जेव्हा माणसाचं नियंत्रण आलं तेव्हा अग्निलाही देव मानणं त्याने सोडून दिलं.

हिंदू धर्मातच माणूस देव होऊ शकतो, इतर धर्मांमध्ये नाही-शाम मानव

आपला एखादा गुरु असावा असं वाटत असतं. कारण आपल्या संस्कारातून ते येतं. व्यावहारिक भलं होईल असं वाटत असतं. चांगली पत्नी मिळेल, पैसे मिळतील. तसंच मोक्ष हवा असेल तर गुरु हवा अशी एक इच्छा दिसून येते. आपल्याला निर्णय घेण्यासाठी गुरु हवा अशीही संकल्पना समाजात रुढ आहे. अशा गुरुला लोक तन-मन आणि धन अर्पण करतात. तन म्हणजे काय तर शरीर अर्पण करणं. पुरुष याचा अर्थ काढतो तर शारिरीक मेहनत अर्पण करणं. त्यामुळे अनेक बाबांकडे रात्रंदिवस राबणारे पुरुष असतात किंवा जी कमाई करतात ती बाबाला अर्पण करतात. श्रद्धा म्हणजे काय? अढळ श्रद्धा म्हणजे काय? याची उदाहरणं दिली जातात. त्यांचा परिणाम आपसूकपणे आपल्या मनावर होतो. भारतातला हिंदू धर्म हा एकमात्र धर्म आहे ज्या धर्मात माणूस स्वतः देव होऊ शकतो. बाकीच्या धर्मांमध्ये माणूस देव होऊ शकत नाही. इतर धर्मांमध्ये प्रेषित असतो, तो निर्माण व्हावा लागतो असं शाम मानव यांनी म्हटलं आहे. सामान्य माणसं हे मानतात कारण माणूस देव होऊ शकतो हे आपल्याकडे लहानपणापासून संस्कार घडवले जातात. त्यामुळे अनेक बाबा स्वतःला देव म्हणून घोषित करतो. असा बाबा मग चमत्कार करतो, आजार बरे करतो आणि इतर गोष्टी करतो ज्या इतरांना करता येणार नाहीत.

Deputy Collector Abhijit Bhande Patil suspension | Ashok Kharat Nashik case updates | Maharashtra Revenue Department action | Bhondu Baba case investigation news
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी निलंबित (छायाचित्र सौजन्य – लोकसत्ता टीम)

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात फरक नेमका काय?

महिलांच्या लैंगिक शोषणाची संपूर्ण प्रक्रिया त्याग आणि भीती या दोन तत्त्वांवर आधारलेली असते. त्यामुळे या स्त्रिया तार्किक बुद्धी वापरत नाहीत आणि बाबा त्यांचा उपयोग करुन घेतात असंही श्याम मानव यांनी म्हटलं आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात काही फरक करता येत नाही. समाजशास्त्र आणि मानसशास्त्रात यांचा अभ्यास केला जातो. ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवतो त्याचा शब्द प्रमाण मानायचा. दुसरी बाब म्हणजे त्याच्याबाबत शंका घ्यायची नाही, तसंच अढळ श्रद्धा ठेवायची. त्यामुळे श्रद्धा ठेवणाऱ्या माणसाला हे समजतच नाही की आपण अंधश्रद्धा पाळू लागलो आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. नागपूरमध्ये एक जज होते त्यांची पत्नी दिसायला देखणी होती. त्या वहिनी सारख्या लांबे महाराज म्हणून एक बाबा होते त्यांच्याकडे जात असत. ज्यानंतर न्यायाधीशांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की आम्हाला वहिनींची चिंता वाटते त्या अनेकदा लांबे महाराजांकडे जात असतात. त्यावर ते न्यायाधीश चिडले, ते म्हणाले की लांबे महाराज प्रत्यक्ष कृष्णाचा अवतार आहेत. त्यांच्याबाबत तुम्ही असं कसं काय बोलता? ज्यानंतर न्यायाधीशांच्या वकील मित्रांच्या लक्षात आलं की यांना पुरावा दाखवल्याशिवाय हे विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे त्या मित्रांनी लांबे महाराज आणि त्या न्यायमूर्तींची पत्नी हे दोघंही आक्षेपार्ह अवस्थेत असलेले फोटो त्यांना नेऊन दाखवले. त्यावेळी त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा चार्ज होता. आपल्याला वाटेल की आता असे फोटो पाहिल्यावर ते पोलिसात गेले असतील किंवा त्यांनी तक्रार केली असेल. पण यातलं काहीही घडलं नाही. हे न्यायमूर्ती थेट लांबे महाराजांकडे गेले. त्यावेळी लांबे महाराज त्यांना म्हणाले बरं झालं तू आलास, मी तुझीच वाट बघत होतो. अरे शिष्या तू केवढा भाग्यवान आहेस तुला माहीत आहे का? ज्या काळात मी गोकुळात भगवान कृष्णाचा अवतार होतो त्या काळात तुझी बायको राधा होती. या जन्मात आता ती पुन्हा आली आहे. तू किती भाग्यवान आहेस. या न्यायमूर्तींनी राहता बंगला आणि त्यांची बायको ही लांबे महाराजांच्या स्वाधीन केली आणि स्वतः सरकारी बंगल्यात राहायला गेले. हे उदाहरण मी अनेकदा दिलंय. कारण तो लांबे महाराज अलिकडच्या काळापर्यंत जिवंत होता. त्यामुळे श्रद्धेचं रुपांतर अंधश्रद्धेत कधी होतं ते समजत नाही. असंही श्याम मानव यांनी सांगितलं.