दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर म्हणून दिशा सालियन काम करत होती. ८ जून २०२० ला तिचा मृत्यू झाला. मुंबईतल्या तिच्या राहत्या घरातल्या गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली होती. मात्र नंतर या प्रकरणी बरेच आरोप प्रत्यारोप झाले. या प्रकरणात आता सीबीआयने चार्जशीट दाखल केली आहे. त्यात आदित्य ठाकरेंचं नाव आहे असं दिशाचे वडील सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी म्हटलं आहे. सूरज पांचोली, डिनो मोरिया आणि इतर नावंही यात आहेत असा दावा त्यांनी केला आहे. आपण जाणून घेऊ हे प्रकरण नेमकं काय?

८ जून २०२० ला काय घडलं होतं?

८ जून २०२० या दिवशी दिशा सालियनचा गॅलरीतून पडून मृत्यू झाला. ८ जूनच्या दिवशी दिशाला लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीचा फोन आला. फोनवर बोलत ती आतमध्ये गेली. दिशाच्या लंडनमधील मैत्रिणीने पोलिसांना तेव्हा दिलेल्या माहितीनुसार, दिशाने लॉकडाऊन अजूनही सुरू असून काम बाकी असल्याचं सांगितलं. ती थोडी चिंतेत वाटत होती. त्यानंतर तिचा मित्र आणि होणारा नवरा रोहन यांनी खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.दिशा खोलीत नव्हती. खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा पडलेली दिसून आली. यानंतर दिशा सालियन प्रकरणात विविध प्रकारचं वृत्त दाखवण्यात आलं. तसंच सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. या प्रकरणात बडी नावं आहेत असेही दावे करण्यात आले. तसंच दिशाची आत्महत्या नसून हत्या आहे आणि हत्येआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला असाही आरोप करण्यात आला होता. नारायण राणे यांनी हे आरोप केले होते.

नारायण राणे यांनी काय आरोप केले होते?

  • दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे
  • बलात्कार करुन मग हत्या केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता.
  • मुंबईत एका पार्टीमध्ये दिशा सालियनवर बलात्कार झाला असून ती गरोदर होती असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला होता.
  • दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक पहारा देत होते? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यांचा अप्रत्यक्ष रोख आदित्य ठाकरेंकडे होता. कारण आदित्य ठाकरे तेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. दरम्यान ५ ऑगस्ट २०२१ ला दिशाच्या वडिलांनी मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिलं होतं.

मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पत्रात दिशाचे वडील सतीश सालियन काय म्हणाले होते?

५ ऑगस्ट २०२१ या दिवशी दिशाचे वडील सतिश सालियन यांनी मुंबई पोलिसांना पत्र यासंदर्भात पत्र लिहिलं. आपल्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की “माझ्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाल्याचं मीडिया दाखवत आहे. या बातम्या पूर्णत: चुकीच्या आणि तथ्यहीन आहेत. यात काहीच तथ्य नाही. चुकीच्या बातम्या देऊन टीव्ही चॅनल्स माझ्या मुलीची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहेत.” “दिशाचा राजकीय नेत्याशी संबंध आणि बॉलिवुडमधील मोठ्या अॅक्टरसोबत पार्टीच्या बातम्या पूर्णत: बनावट आहेत,” असं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं होतं.

दिशाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला होता का?

दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत बोलताना पोलिसांनी, दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याचसोबत पंचनामा करताना आई-वडील उपस्थित असल्याची माहिती दिली होती

मागील वर्षी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या ८ जून २०२० रोजी झालेल्या अचानक आणि गूढ मृत्यूनंतर हे प्रकरण अत्यंत वादग्रस्त ठरले. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची (ADR) नोंद करत दिशाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र, या प्रकरणातील संशयास्पद बाबी आणि नंतर तिच्या वडिलांनी केलेले खळबळजनक आरोप यामुळे या घटनेला वेगळे वळण मिळालं. पोलिसांनी चौकशीअंती दिशाने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र, तिचे वडील सतीश सालियन यांनी मागील वर्षी याचिका करून दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. ज्यानंतर आता या प्रकरणात सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे.