राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. विविध मुद्य्यावरून विरोधकांना सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. तसेच, विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त पद्धतीने न घेता, आवाजी मतदानाद्वारे होणार असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आक्षेप नोंदवला. “विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त पद्धतीने न घेणार्‍या राज्य सरकारला नेमकी कसली भीती? ” असा सवाल फडणवीस यांनी केला.

सभागृहात या मुद्य्यावर बोलता विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्राच्या निर्मितीला आत ६० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे आणि अचानक एवढी भीती का सरकारी पक्षाच्या मनामध्ये? की सिक्रेट बॅलेटने जी अध्यक्षाची निवड व्हायची, ती आता आपण वेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्णय करतोय. सत्ता पक्षाला आपल्या आमदारांवर विश्वास उरलेला नाही? सत्ता पक्षाजवळ बहुमत नाही? की उघडपणे सगळेजण पाठींबा देतात, पण प्रत्यक्षात मनामध्ये प्रचंड खदखद असल्यामुळे सिक्रेट बॅलटमध्ये आपला अध्यक्ष ते पाडतील, अशा प्रकराची कदाचित भीती या ठिकाणी दिसत आहे. परंतु त्याही पेक्षा एकीकडे आपण नियमांमध्ये बदल करतात आणि नियमांमध्ये बदल करताना एवढी घाई कशासाठी? दहा दिवसांचा कालावधी सूचना, आक्षेपांना असताना आपण तो कालावधी अधिनियम ५७ चा वापर करून एक दिवसांवर आणला, तोही उद्या दुपारी १ वाजेपर्यंत. अधिनियम ५७ चा वापर या प्रस्तावासाठी करता येणार नाही. कारण, अधिनियम ५७ च्या अंतर्गत आपण नियम स्थगित करू शकतो, पण नियमाच्या रचनेत बदल करू शकत नाही. यामध्ये आपण नियमात बदल करत आहोत आणि नियमाच्या रचनेत बदल करायचा असेल तर पुन्हा एकदा नियम २३३ ची प्रक्रिया करून, आपल्याला २२५ मध्ये बदल करावा लागेल. पण असं होताना हे दिसत नाही. म्हणून याला आमची पूर्णपणे हरकत आहे आपण जर हे रेटून नेणार असाल तर आम्ही कायदेशीर लढाई लढू.”

तसेच, “मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं असुरक्षित सरकार… आता हे सांगतील वरील सभागृहात असं आहे, ६० वर्षे वरील सभागृहात, लोकसभेत तसंच होतं. ६० वर्षानंतर अचानक असे बदल करायची वेळ का आली? अशाप्रकारे आपल्या आमदरांवर अविश्वास दाखवण्याची वेळ का आली? एवढं असुरक्षित सरकार कधीही बघितलं नाही. म्हणून हा जो प्रस्ताव मांडलेला आहे याला माझी हरकत आहे.” असंही फडणवीस म्हणाले.

याचबरोबर, नवाब मलिकांनी उद्देशून फडणवीस यांनी म्हटले की, “अटलजींचा विषय या ठिकाणी आणला म्हणून सांगतो, राज्यसभेचं मतदान खुलं केलं पण आपल्या माहितीसाठी समजा अध्यक्षाची जी निवडणूक आहे. त्यामध्ये जर यांनी(पटोलेंकडे हात दाखवत) घोडेबाजार झाला असता, तर त्याला व्हीप लागू झाला असता. समजा एखाद्या पक्षाचा अध्यक्ष हरला, तरी देखील सरकार पडत नाही आणि म्हणून अध्यक्षाच्या निवडणुकीत सदसद् विवेक बुद्धीचा वापर झाला पाहिजे. म्हणून अटलजींनी पण सगळे बदल केले, पण अध्यक्षाच्या निवडणुकीला व्हीप लागू केला नाही. त्यामुळे अध्यक्षाच्या निवडणुकीत व्हीप देता येत नाही. त्यामुळे अटलजींच्या नावाने उगीच आम्हाला चुकीच्या गोष्टी का सांगता? अटलजी आमचं श्रद्धास्थान आहे त्यांच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. अटलजींनी जर सांगितलं असतं आम्हाला, तर नवाबभाई तुमच्यासह सगळ्यांना अध्यक्ष बनवून आम्ही निघून गेलो असतो. पण त्यांच्या नावाने काहीही का सांगता? हे या ठिकाणी चुकीचं होतंय, ६० वर्षानंतर झालेली जी उपरती आहे, ही काही फार चांगल्या भावनेतून झालेली नाही. ही भीतीमधून झालेली आहे. तुम्हाला जर करायचं आहे तर पूर्ण नियम पाळा, तुम्ही दहा दिवसांची मूदत जी एका दिवसावर आणता त्याला आमचा आक्षेप आहे.”