“गुजरात, सोलापूर, जतच्या सीमेवर जे झालं, या गोष्टी एकदम आताच का आल्या?” ; शरद पवारांचा सवाल! | What happened on the border of Gujarat, Solapur Jat why did these things happen now Sharad Pawars question msr 87 | Loksatta

गुजरात, सोलापूर, जतच्या सीमेवर जे झालं, ते एकदम आत्ताच का होतंय? – शरद पवारांचा सवाल!

“आता कुणीतरी या ठिकाणी जाणीवपूर्वक ….”, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

गुजरात, सोलापूर, जतच्या सीमेवर जे झालं, ते एकदम आत्ताच का होतंय? – शरद पवारांचा सवाल!
(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. अशातच आता बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या घटनेवर पत्रकारपरिषदेत घेत नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील विविध गावांमध्ये सीमा प्रश्नावरून वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जाऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवरही प्रतिक्रिया दिली.

YouTube Poster

शरद पवार म्हणाले, “जे काही गुजरातच्या सीमेवर झालं, जे काही सोलापुरच्या सीमेवर झालं किंवा जे काही जतच्या सीमेवर झालं, या गोष्टी तशा एकदम आताच का आल्या? मी सोलापुरचा सात-आठ वर्षे पालकमंत्री होतो. मला सोलापुरची चांगली माहिती आहे. हा प्रश्न माझ्या त्या कालखंडात कधी कोणी मांडला नव्हता. जत असेल किंवा गुजरातच्या सीमेवर हे प्रश्न कधी कोणी मांडले नव्हते.”

हेही वाचा – बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन, म्हणाले…

याचबरोबर, “आता कुणीतरी या ठिकाणी जाणीवपूर्वक चिथावणी देण्याचा प्रयत्न करतोय आणि दुर्दैवाने राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. ठीक आहे, त्या भागातील लोकांच्या काही समस्या असतील, तर आम्ही त्यांना भेटू. त्यांच्यात सामंजस्य निर्माण करू. हे एक नवीन चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यातून मार्ग काढू.” असंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा – Maharashtra Karnataka Border Dispute : ‘हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत?’; रोहित पवारांचा सवाल!

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांनी पाणीप्रश्नावरून कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव केला आहे, असा दावा बोम्मई यांनी केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 16:57 IST
Next Story
महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावात हल्ला: अजित पवार संतापून म्हणाले, “‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने…”