Ajit Pawar Plane Accident Eye Witness: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी पार पडला आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता कुणाच्या हाती? या मुद्द्यावर सध्या मोठा खल चालू आहे. त्याचवेळी अजित पवारांचा विमान अपघात हा घातपात आहे का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात असताना विरोधकांसह खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेतेमंडळींनीही या घटनेच्या सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. अपघातावेळी नेमकं काय दिसलं? यासंदर्भात आता बारामती विमानतळ असणाऱ्या गोजूबावी गावाच्या माजी सरपंचांनी मोठा दावा केला आहे.
अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर याच गावात गेलो असता कल्याण अटोळे यांच्याशी आपली चर्चा झाल्याचा दावा अमोल मिटकरींनी एका जाहीर सभेत केला आहे. विमानात ६ नसून फक्त ५ माणसं होती, असं त्यांनी सांगितल्याचंही अमोल मिटकरींनी म्हटलं आहे. पण खुद्द कल्याण अटोळे यांनी मात्र यासंदर्भात अमोल मिटकरींशी कोणताही संवाद झाला नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये संवाद झाला की नाही? यासंदर्भात स्पष्टता नसली, तरी कल्याण अटोळेंनी विमानातील प्रवाशांची संख्या, विमान कोसळल्यानंतरचं दृश्य यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत.
अजित पवारांचं विमान कोसळण्यापूर्वी काय घडलं?
गोजूबावी गावाचे माजी सरपंच कल्याण अटोळे यांनी एबीपीशी बोलताना यासंदर्भातले दावे केले आहेत. विमान कोसळण्याच्या आधीपासून आपण ही घटना पाहिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “सकाळी ८.३५ च्या सुमारास गावातून एक मोठं विमान खूप मोठा आवाज करत घिरट्या घालत निघाल्याचं दिसलं. त्यानंतर धावपट्टीवर उतरताना ते डावीकडे कललं आणि पुढे जाऊन कोसळलं”, असं कल्याण अटोळे म्हणाले.

“विमान कोसळल्यानंतर ४ ते ५ मिनिटांतच आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही पोहोचल्यानंतर तिथे विमानाचा मोठा स्फोट झाला. त्याचे तुकडे हवेत आणि आजूबाजूला १००-१५० फुटांवर पडले”, असंही अटोळे यांनी सांगितलं.
“कुणीतरी बाहेर उतरण्याचा प्रयत्न करत होतं”
दरम्यान, विमान कोसळलं त्या ठिकाणी कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं, असा दावा कल्याण अटोळे यांनी केला आहे. “मी उजव्या बाजूला उभा होतो. तेव्हा त्या बाजूच्या दरवाजातून निळी पँट घातलेली एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. त्याचा एक पाय दरवाजातून बाहेर आल्याचं मला जाणवलं. त्याचा दरवाजा थोडा उघडल्याचं दिसलं. तेवढ्यात आमच्या गावातले काहीजण ओरडले की ‘सरपंच तुम्ही मागे सरका, तिथे मोठा स्फोट होईल’. मी मागे सरकलो आणि काही क्षणांत मोठा स्फोट झाला. पूर्ण विमानाचे तुकडे-तुकडे झाले”, अशा शब्दांत अटोळे यांनी तिथला प्रसंग सांगितला.
विमानात सहा नाही, पाचच लोक होते!
अजित पवारांच्या विमानात एकूण ५ लोक होते की ६? याबाबत संशय व्यक्त होत आहे. यासंदर्भात कल्याण अटोळेंनी दावा केला आहे. “अमोल मिटकरी आणि माझं प्रत्यक्षात काही बोलणं झालं नाही. पण विमानात पाचच लोक होते. अजितदादा डाव्या बाजूला पडले होते आणि उजव्या बाजूला त्यांचे अंगरक्षक पडले होते. विमानात तीन माणसांचा कोळसा झालेला होता. आम्ही तिथे दोन ते तीन तास होतो. पण विमानात पाचच माणसं होती”, असं ते म्हणाले.
“अजितदादा खाली पडल्यानंतर सुरुवातीला आम्हाला काही काळ कळलं नाही की ते अजित पवार आहेत. पण नंतर काही लोकांनी आम्हाला सांगितलं की ते अजित पवारच आहेत आणि हे विमानही त्यांचंच आहे. लोकांचा त्यावर आधी काही विश्वास बसला नाही. पण नंतर जसजसे आणखी लोक येऊ लागले, तसतसं लोकांनी अजितदादांना ओळखलं. नंतर लोकांनी चादरी, सतरंज्या आणल्या आणि त्यात अजित पवारांना ठेवून आम्ही रुग्णालयात पाठवून दिलं”, असंही त्यांनी नमूद केलं.
अजित पवारांच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींचा दावा काय?
दरम्यान, अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या अपघाताबाबत गावच्या माजी सरपंचांशी बोलणं झाल्याचा दावा केला आहे. “सरपंचांनी असं सांगितलं की कुणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्यांना वाचावयला गेलो तर अचानक स्फोट झाले. नंतर कळलं पाच मृतदेह त्या ठिकाणी सापडले. UGCA कडून सांगितलं जातं आहे की विमानात सहा जण होते. आता हा घात आहे की अपघात?” असा प्रश्न अमोल मिटकरींनी उपस्थित केला आहे.
अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स कुठे आहे?
अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स चर्चेत आला असून अद्याप त्यातील माहिती समोर आलेली नाही. ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या कॉकपिटमध्ये काय संभाषण झालं याची माहिती रेकॉर्ड होते. त्याशिवाय, डिजिटल माध्यमात उपकरणांवर किंवा संदेशाच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी केल्या गेल्या, याचीदेखील माहिती जमा होत असते. त्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघातावेळी नेमकं काय घडलं? या अपघातामागे नेमकं काय कारण होतं? याचा खुलासा या ब्लॅक-बॉक्समधून होण्याची शक्यता आहे.

