मुंबई : राज्यात यंदाचा उसाचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू झाला. गत तीन महिन्यात सुमारे ८७०.२९ लाख टन उसाचे गाळप करून ८०.६३ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. हंगामअखेर सुमारे ११० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.
सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दोन फेब्रुवारीपर्यंत ९८ सहकारी, १०१ खासगी, अशा १९९ कारखान्यांनी दैनंदिन सरासरी दहा लाख टनांनी प्रतीदिन ८७० लाख टन उसाचे गाळप करून सरासरी ९.२७ टक्के साखर उताऱ्यासह ८०.६३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
कोल्हापूर विभाग साखर गाळप, साखर उतारा, उत्पादनात आघाडीवर आहे. विभागातील ३७ कारखान्यांनी २०.२९ लाख टन, पुणे विभागातील ३० कारखान्यांनी १८.९२ लाख टन, सोलापूर विभागातील ४७ कारखान्यांनी १५.५७ लाख टन, अहिल्यानगर विभागातील २६ कारखान्यांनी ९.५४ लाख टन, छत्रपती संभाजीनगर विभागातील २२ कारखान्यांनी ६.७२ लाख टन, नांदेड विभागातील ३० कारखान्यांनी ८.६५ लाख टन, अमरावती विभागातील ४ कारखान्यांनी ८.६३ लाख टन, नागपूर विभागातील ३ कारखान्यांनी ६२ हजार टन साखर उत्पादन केले आहे.
चांगल्या थंडीमुळे जानेवारीअखेर हंगाम जोमाने सुरू होता. फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यातच कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हंगाम फेब्रुवारीअखेरपर्यंत जोमाने सुरू राहील. त्यानंतर धुराडी हळूहूळ बंद होण्यास सुरुवात होईल. राज्यात सरासरी ११० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.
असा असतो गाळप हंगाम
महाराष्ट्रातील साखर गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाला असून, आता अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस गाळप होते. पूरग्रस्त भागातील परिस्थिती लक्षात घेऊन हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. साखर उतारा सुधारण्यासाठी आणि गाळप सुरळीत ठेवण्यासाठी कारखाने प्रयत्नशील आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत (२०२४-२५) या वर्षी साखर उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे.

