महाराष्ट्रात २० वर्षांपूर्वी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण घडलं होतं. या प्रकरणाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर गेला. महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या अंतिम निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी पार पडली. या प्रकरणात कोर्ट काय निर्णय देणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी कोर्टाने सर्व नऊ आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होती. त्यानुसार माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ आरोपी कोर्टात हजर झाले होते.

२० जून रोजी पुढील सुनावणी

१४ मे रोजी या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणार असं बोललं जात होतं. मात्र त्यावेळी कोर्टात आरोपी हजर नव्हते. तेव्हा कोर्टाने १६ जूनला सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्व आरोपी कोर्टात हजरही झाले. न्यायाधीशांनी सर्व आरोपींची हजेरी घेतली. त्यानंतर आजचा निकाल पुढे ढकलला आहे. हा निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं. त्यानुसार कोर्टाने पुढील सुनावणी २० जूनला ठेवली आहे. महाराष्ट्र या घटनेमुळे हादरला होता. २० वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. आपण जाणून घेऊ पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमकं काय आहे आणि निकाल लांबणीवर गेल्यावर ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

“आयुष्यात ज्यासाठी संघर्ष केला, अपेक्षा हीच आहे की न्याय देवतेने न्याय करावा. ओमराजेंना बोलताना भावना अनावर झाल्या. भारतीय न्यायव्यस्थेवर माझा विश्वास आहे. त्या जोरावरच आम्ही मागील २० वर्षांपासून हा लढा देत आहोत.न्याय मिळण्यासाठी आम्ही संघर्ष करतोय सर्वसामान्यांच्या लोकांच्या आशीर्वादाने मी दोन्ही लढाया लढतो. राजे साहेबांच्या हत्येमुळेच मी राजकारणात आलो. आपल्याला राजकीय विरोधक नको म्हणून सुनियोजित कट रजून ही हत्या झाली होती, मला आपल्या न्यायदेवतेवर विश्वास आहे, दोषींना फाशीच व्हावी, हीच माझी मागणी आहे, असं ते म्हणाले.

पवनराजे निंबाळकर यांची हत्या कशी झाली?

३ जून २००६ ही तारीख होती, मुंबईत काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हे आले होते. त्यांचं काम संपल्यानंतर ते पुण्याच्या दिशेने निघाले होते. पवनराजे निंबाळकर जेव्हा कळंबोली या ठिकाणी पोहचले तेव्हा त्यांना तिथे एका व्यक्तीला बार्शी येथील जमिनीच्या व्यवहाराबाबत चर्चा करायची होती. पवनराजे पांढऱ्या कारने कळंबोलीतील चार रस्ता भागात पोहचले, तिथे पवनराजेंवर हल्ला करण्यासाठी मारेकरी आधीपासूनच पाळत ठेवून होते असं सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. मारेकऱ्यांनी त्यांच्या कारला ओव्हरेटक केलं. चालकाला कार थांबव असं सांगितलं. पवनराजेंना कारमध्ये झोप लागली होती. मारेकरी कारजवळ आले आणि चौकशी करण्याच्या निमित्ताने बोलू लागले. तेव्हा कार चालकाने त्यांना उठवलं आणि खिडकीच्या काचा खाली केल्या. ज्यानंतर या शूटर्सनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. पवनराजे यांना जखमा झाल्या, त्यांचा कार चालक समद काझीही जखमी झाला. सीबीआयने दिलेल्या आरोपपत्रानुसार मारेकरी कारने पळून गेले. काही अंतरावरुन त्यांनी बंदूक आणि इतर हत्यारं फेकून दिली. पनवेल येथील बेलवली या गावात मारेकऱ्यांनी इंडिका सोडून दिली.

राजकीय वैमनस्यातून हत्या

पवनराजे हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आरोपी सीबीआयकडे सुपूर्द केले.

CBI ने दोषारोपपत्रात म्हटल्याप्रमाणे, २००५ मध्ये पद्मसिंह पाटील, सतीष मंदादे आणि मोहन शुक्ला यांनी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं षड्यंत्र रचलं. पवनराजे निंबाळकर हे पद्मसिंह पाटील यांची राजकीय कारकिर्दि आणि अस्तित्वासाठी धोका बनू लागले होते.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी सीबीआयने जून २००९ मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक केली. पाटील त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद मतदार संघाचे खासदार होते.

राजकीय जाणकार सांगतात, तेरणा साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील वितुष्ट टोकाला पोहोचलं होतं.

पद्मसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

सीबीआयने कोर्टात दाखल चार्जशीटमध्ये पवनराजे यांच्या हत्येबाबत सविस्तर उल्लेख केला आहे.

आरोपपत्रानुसार, जानेवारी २००५ मध्ये पारसमल जैन या प्रकरणातील सह आरोपी मोहन शुक्लाला आर्थिक मदतीसाठी भेटला. शुक्लाने जैनला पवनराजे निंबाळकर, पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाला कसा धोका आहेत याची माहिती दिली.

शुक्लाने जैनला लातूरच्या सतीष मंदादे यांना भेटण्यासाठी सांगितलं. मंदादे जैनला घेऊन पद्मसिंह पाटील यांच्या घरी गेले. आणि सुपारी दिल्याचं त्यांनी सांगितलं. हे काम झाल्यानंतर समाजसेवक अण्णा हजारे यांनाही मारायचं आहे असं जैनला सांगण्यात आलं.

सीबीआयचे दावे काय?

राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांनी राजकीय वैराचा वचपा काढण्यासाठी चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचला.

पद्मसिंह पाटील यांनी ३५ लाखांची सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणलं.

२००९ मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली. मात्र तेव्हापासून ते जामिनावर आहेत.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी मुंबईच्या सेशन्स कोर्टात सुरू आहे. या प्रकरणी १६० च्या आसपास साक्षीदार होते. या सुनावणीला २०११ मध्ये सुरूवात झाली.