scorecardresearch

“साहित्यिकांच्या मेळाव्यात राजकारण्यांचं काय काम? म्हणूनच आम्ही इथे…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

मराठी साहित्य संमेलन आणि सारस्वतांचा मेळा पाहून मला खूप आनंद झाला आहे की एका कृतज्ञ भावनेतून मी या ठिकाणी आलो आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे

Cm Eknath Shinde
एकनाथ शिंदे

मराठी भाषेसाठी साहित्यिकांनी दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही. राजकारण्यांसाठी गर्दी, सभा यांचं काही विशेष महत्त्व नसतं. मात्र आज इथे जमलेली गर्दी ही साहित्यावर प्रेम करणाऱ्यांची गर्दी आहे. पंढरीची वारी वारकरी करतात त्याचप्रमाणे साहित्यावर प्रेम करणारे रसिक या ठिकाणी येतात असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मराठी म्हणजे एक चमत्कार घडवणारी भाषा आहे याचा आपल्याला अभिमान आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कवी कुमार विश्वास यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आहे.

साहित्याची पंढरीच मला दिसते आहे

आज साहित्य नगरी या ठिकाणी सजली आहे. आज खरं म्हणजे साहित्याची पंढरी असं या ठिकाणाचं वर्णन केलं तर वावगं ठरणार नाही. तीन दिवसांचं हे साहित्य संमेलन आहे. या ठिकाणी साहित्याचा जागर होतो आहे. त्यासाठी मी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे साहित्य संमेलनात राजकारण्यांचं काय काम ? त्यामुळे मी या कार्यक्रमात एक साहित्य रसिक म्हणूनच आलो आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.आम्ही या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलो आहोत. कुठेही सरकारचा हस्तक्षेप या कार्यक्रमात असणारन नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

साहित्य संंमेलनात विचारांचं मंथन

साहित्य संमेलनात विविध विचारांचं मंथन होणार आहे. सांस्कृतिक लोकशाहीचं हे विराट रुप आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून नाही तर सामान्य माणूस, साहित्य रसिक म्हणून आलो आहे. मी आपल्याला आवर्जून सांगेन की आम्ही जेव्हा दाव्होसला गेलो होतो तेव्हा आम्हाला जगभरातले मराठी लोक भेटले. मलाही तिथे मराठी ऐकून खूप समाधान वाटलं. त्यांचंही हेच म्हणणं आहे की अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपण एकत्र आलं पाहिजे. मराठी माणसाविषयीचा जिव्हाळा, आपुलकी ही अशा प्रकारच्या संमेलनातून वाढत असते.

ज्यांनी ब्रिटिशांना चले जाव असं ठणकावलं आणि देशवासीयांना खेड्याकडे चला असा मंत्र दिला अशा महात्मा गांधींचं वास्तव्य झालेल्या या भूमिला मी वंदन करतो आहे. या साहित्य संमेलनात उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. मला साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्याचा बहुमान मला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. मी आज एका कृतज्ञ भावननेने इथे उभा आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

साहित्य संमेलनात राजकारण्याचं काय काम?

साहित्य संमेलनात राजकारण्यांचं काय काम? या ठिकाणी साहित्यिकांचं राज्य आहे. एक वेगळा आनंद या ठिकाणी ओसंडून वाहतो आहे तिथे आम्ही राजकारणी काय करणार? असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. समाजाला दिशा देणारे आणि बळ देणारे सगळे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेतेच असतात. दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख असं समजून साहित्यिक त्यांचं काम करत असतात. सामाजिक तमळमळीतूनच साहित्यिकांचं साहित्य जन्माला येत असतं असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 14:10 IST