पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुजारी, मठाधीश यांना संसदेत बोलवून जे काही नव्या संसदेत केलं, पुजारी आणले ते वेदना देणारं आहे. राम मंदिरात, शिव मंदिरात पूजा करणं याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. पण नवी संसद हे लोकशाहीचं मंदिर आहे. आपण सर्व धर्मांना, जाती पंथांना एकत्र घेऊन हे चालवणार असं संविधान सांगतं. अशावेळी मोदींनी जे केलं ते जगाने पाहिलं आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. सेंगॉलही एका राजाने दुसऱ्या राजाला द्यायचा असतो. इथे जनताच राजा आहे तरीही सेंगॉलची पूजा करण्यात आली असंही भुजबळ म्हणाले.
नव्या संसदेबाबत आमचं काही म्हणणं नाही पण
नव्या संसदेची गरज आहे, खासदारांची संख्या वाढवली पाहिजे, नवं संसद भवन बांधलं याविषयी आमचं काहीही म्हणणं नाही. मात्र इतके पुजारी का? अशा प्रकारचा सोहळा हा वेगळ्या पद्धतीने करता आला असता. मात्र काय बोलणार? असं म्हणत छगन भुजबळ यांनी या प्रकरणी टीका केली आहे.




मठाधीश, पुजारी यांच्या उपस्थितीत पूजा अर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचं रविवारी उद्घाटन केलं. यावेळी विविध पुजारी होते. सेंगोलची विशिष्ट पद्धतीने पूजा करण्यात आली आहे प्रतिष्ठापना करण्यात आली. तसंच इतरही विविध पूजा कऱण्यात आल्या. त्यावर आता टीका होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वर्तन लाज आणणारं आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसंच हे सगळं पाहून वेदना झाल्या असंही त्यांनी म्हटलं आहे.
सामनातूनही मोदींवर टीका
नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यातून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते सगळे अदृश्य होते. मग त्या उद्घाटन सोहळ्यास कोण उपस्थित होते? नव्या संसद भवनाच्या सोहळ्यात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांना फाटा देऊन अंधश्रद्धा, धर्मकांद यांना महत्त्व देणाऱ्यांचा भरणा होता. राजदंडही आता आला, म्हणजे यापुढे एकप्रकारे राजेशाहीची सुरुवात झाली. दिल्लीत लोकशाहीच्या नावाखाली नव्या बादशाहीचा राजदंड पोहचला आहे. विज्ञान, संशोधन न मानणाऱ्या लोकांच्या गराड्यात मोदी आले, त्यांनी धर्मकांड केले. यास हिंदुत्व म्हणाले की राज्याभिषेकाचा सोहळा? हिंदुत्वात श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. भारतीय संसदेचे हे कोणते रुप आपण जगाला दाखवत आहोत? असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.